आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:रात्री बेशुद्ध करता येत नव्हते, म्हणून बिबट्याला झडप घालून पकडले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरवी बिबट्या त्याच्या सावजावर झडप घालतो. पण, इथे शिकारी बिबट्याच सावज होता. रात्रीच्या अंधारामुळे जखमी बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याचा पर्याय संपला होता. शेवटी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या रेस्क्यू टीमने झडप घालून बिबट्याला जाळ्यात पकडले. ही घटना नागपूर वन विभागाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात रविवारी रात्री घडली.

वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील व रितेश भोंगाडे यांनी प्राथमिक सूचना दिल्यानंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची रेस्क्यू टीम बेशुद्ध करण्याचे तसेच रेस्क्यूचे साहित्य घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी निघाली होती. घटनास्थळ गाठेपर्यंत रात्रीचे ८ वाजले होते. रात्र असल्याने बिबट्याला बेशुद्ध करण्याचा पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे त्याला थेट झडप घालून जाळ्यात पकडणे हा एकमेव पर्याय टीमपुढे होता. एवढ्या काटेरी झुडुपात बिबट्याला जाळे टाकून पकडणे कठीण होते. तो जखमी होता, पण त्याची हालचाल होती. ट्रान्झिटच्या टीमने हे आव्हान स्वीकारत त्याला पकडण्याचा चंग बांधला. बिबट्या काटेरी झुडपातून पळत होता. ट्रान्झिटची टीम त्याच्या मागावर होती. त्यातील काही खड्ड्यात पडले, काहींना काट्यांनी ओरबाडले. पण शेवटी टीमने बिबट्याला जाळ्यात पकडलेच. बिबट्याला उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला रात्रीच हलवण्यात आले. त्याची प्रकृती थोडी नाजूकच आहे, पण उपचार सुरू आहेत.

उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, राज्य वन्यजीव मंडळ सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पूर्ण केली. सोबत वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील यांची टीम होती. ट्रान्झिटच्या टीममध्ये आणि हिमतीने बिबट्याला पकडणारे डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. पूर्वा निमकर, सिद्धांत मोरे, बंडू मंगर, शुभम मंगर, विलास मंगर, स्वप्निल भुरे, चेतन बारस्कर हे होते.

बातम्या आणखी आहेत...