आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणराजाची अवकृपा:नागपूर जिल्ह्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, संत्रा, गहू, चणा पिकांचे प्रचंड नुकसान

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास काटोल, कळमेश्वर, नरखेड, कुही आणि रामटेक तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले. यामध्ये गहूपीक जमिनीवर झोपले तर संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली. चणाही मातीमोल झाला असून आंबापीकही जमिनीवर आले.

भाजीपाला पिकाची माती झाली आहे. बोर, लिंबू इतक्या आकाराच्या गारांचा पावसाने जवळपास अर्धातास थैमान घातले. काही शेतकऱ्यांच्या शेतात गारांची अक्षरश: चादर अंथरल्याचे चित्र होते. त्यावरून बळीराजाच्या नुकसानाची तीव्रता अधिक स्पष्ट होत होती.

काटोल तालुक्यातील सोनोली, मेंडकी, गोधनी, तपणी, झिल्पा, इसापूर व नरखेड तालुक्यातील सावरगाव परिसर तर कळमेश्वर तालुक्यातील मोहपा, सवंद्री, कोहळी, बुधला, लोहगड, रामगिरी, पारडी देशमुख, उबगी, उबाळी, पोही, सोनेगाव, खैरी, घोराड या गावांत गारपिटाने अधिक नुकसान झाले आहे. कापणीला आलेले चणापीक हातातून गेल्याचे स्थिती आहे. रामटेक तालुक्यातील देवलापार, मानेगाव टेक व करवाही परिसरात गारपीट तर इतर ठिकाणी वादळी पाऊस आला. मौदा तालुक्यात तुरीइतकी गार पडली. पानमारा, गोवरी, नांदगाव, मोहाडी, कोटगाव भागातील उन्हाळी सोयाबीन, गहू आणि चणा पिकावर संकट ओढावले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

पाहा फोटो...