आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोयाबीन व इतर पिकांसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाण्यांचा वापर करावा. असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी येथे केले आहे. मागील तीन वर्षांतील खतांची मागणी लक्षात घेवून नियोजन करण्यात आले असून, यंदा 5 लाख 83 हजार मेट्रिक टन सरासरी मागणी असून प्रत्यक्ष 6 लाख 23 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा होणार आहे.
नागपूर विभागात 19 लाख 58 हजार 566 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कापूस, सोयाबीन, तूर, भात, इतर बियाणे व खते उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विभागात खरीप पिकाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी सोयाबीन व इतर पिकांची पेरणी करावी. असे कृषी सहसंचालकांनी सांगितले आहे.
विभागात सरासरी 51 लाख हेक्टरपैकी 19 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने कापूस 6 लाख 20 हजार हेक्टर, सोयाबीन 3 लाखव 2 हजार 650 हेक्टर, तूर 1 लाख 97 हजार हेक्टर, भात 8 लाख 30 हजार तर इतर पिकाखाली 8 हजार 716 हेक्टरचा समावेश आहे. मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे या पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असून त्यादृष्टीने बियाण्यांचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे खरेदी करावीत. तसेच बियाण्यांच्या पिशवी वरील प्रमाणपत्र न काढता खालच्या बाजूने बियाणे काढावे. काही बियाणे उगवणक्षमता तपासण्यासाठी शिल्लक ठेवावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सोयाबीन हे संवेदनशील पीक असल्याने जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. उगवण क्षमता तपासूनच त्याप्रमाणात बियाण्याचा वापर करावा. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. तसेच पेरणीसाठी टोकण पद्धती किंवा प्लँटर पद्धतीचा वापर करावा. पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत प्रत्येक कृषी सहायकाला सर्वेक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीच्या आधारे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सल्ला प्रसारित करतील, अशी माहिती भोसले यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.