आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल सत्तार यांचे निर्देश:मंदिर-मशिदीवरील भोंग्यांचा वापर पीक सर्वेक्षणासाठी करा, शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणार

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिर-मशिदींवरील भोंग्यांचा वापर पीक सर्वेक्षणाच्या सूचना देण्यासाठी करा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे आयोजित कृषी विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत दिले. पंचनामे करताना ग्रामसभा घ्यावी, सरपंच लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, पाणी साचलेल्या दुर्गम ठिकाणांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनची मदत घेण्याचे निर्देशही सत्तार यांनी या वेळी दिले. या सर्वेक्षणाला सात दिवसात अहवाल द्यावा, असे सत्तार यांनी सांगितले.

दरम्यान, सत्तार यांनी भोंग्यांच्या विधायक वापराबाबत केलेल्या सूचनेचे मंदिर आणि मशिदीशी संबंधित नागरिकांनी स्वागत केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला खासदार कृपाल तुमाने, सुनील मेंढे, अशोक नेते, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

राज्यपालांचेही मार्गदर्शन घेऊ

शरद पवार या देशाचे कृषिमंत्री होते. त्यांचे मार्गदर्शन घ्यायला मला काही हरकत नाही. शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच आहे. राज्यपालांनीसुद्धा शेतकऱ्यांसोबत काम केले आहे. या दोघांचेही मार्गदर्शन घेऊ,असे सांगत मी लोकल गाडी आहे, हात दाखवा कुठेही थांबवा असे माझे काम असल्याचे सत्तार म्हणाले.

मशिदी हे माध्यम
कोल्हापूर आणि कोकण येथे पूर परिस्थितीमध्ये मशिदीमध्ये आश्रय देण्यासोबतच भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मशिदी म्हणजे अल्लासह माणसाला माणसासोबत जोडण्याचे माध्यम आहे. त्यामुळे बिकट परिस्थितीमध्ये मानव कल्याणासाठी मशिदीच्या भोंग्यावरून त्यांना सूचना देणे यात काही गैर नाही.
- मौलाना इलियाज खान फलाई, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्य

एकोप्यासाठी चांगली कल्पना

औरंगाबादमधील वरद गणेश मंदिराचे अध्यक्ष मनोज पाडळकर म्हणाले की, यामुळे गावांमध्ये एकोपा निर्माण हाेईल. मंदिराच्या भोंग्याद्वारे नैसर्गिक संकटाची माहिती दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. आम्ही स्वागत करतो.

मंत्र्यांची कल्पना मानवतेचे काम
औरंगाबादमधील इमाम ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हाफिज इक्बाल अन्सारी म्हणाले की, मशिदीवर भोंग्याद्वारे नैसर्गिक संकटापासून वाचवण्यासाठी सूचना देण्याची कल्पना चांगली आहे. केवळ मशीदच नाही तर सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंग्याद्वारे सूचना देऊन मानवतेसाठी काम करावे.

जीवित-वित्तहानी हाेणार नाही

औरंगाबाद​​​​​​​च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी राजीव जहागीरदार म्हणाले की, नैसर्गिक संकटाबद्दल मंदिराच्या भोंग्यातून सूचना देणे योग्य आहे. जीवित व वित्तीय हानी होणार नाही. आम्ही स्वागत करतो.

बातम्या आणखी आहेत...