आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाजगी व शासकीय पशुवैद्यक यांना एकत्रित करून मुक्या जनावरांची अद्यावत शुश्रूषा नागपूर शहरात लवकरच सुरू होणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अद्ययावत पशुवैद्यकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी रविवारी आयोजित माफसूच्या बैठकीत केली.
विदर्भातील पशुधनाला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. उपलब्ध असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्याचे अद्यावतीकरण करण्यात यावे. खाजगी व शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मनुष्यबळाची जुळवाजुळव करून उच्च प्रतीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नागपुरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व्हेटर्नरी क्लिनिक कॉम्प्लेक्स येथे रविवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र पशु विज्ञान मत्स्य विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. आशिष पातुरकर, सर्व शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पशुवैद्यक व खाजगी स्तरावर पशुवैद्यक सेवा देणारे शहरातील नामवंत डॉक्टर यावेळी उपस्थित होते. सहआयुक्त शितलकुमार मुकणे यांनी पुणे येथील प्रस्तावित हॉस्पिटलचे प्रेझेंटेशन केले.
उपराजधानीमध्ये मुंबई-पुणे याप्रमाणे अद्ययावत पशुवैद्यकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठीचे प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले. अद्यावत शासकीय यंत्रणा आपल्याकडे आहे, या अद्ययावत यंत्रणेचा व उपचार पद्धतीचा लाभ मुक्या जनावरांना झाला पाहिजे. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गोधनाला सुदृढ ठेवणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे हे काम या ठिकाणावरून झाले पाहिजे. यासाठी खाजगी-शासकीय असा भेदाभेद न ठेवता समन्वय साधून यातून तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत गेल्या काही वर्षात महत्त्वाच्या प्रजातीच्या जनावरांमध्ये दुधाची क्षमता कमी होण्याबाबतही चिंता त्यांनी व्यक्त केली. ही क्षमता कमी होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत, याचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले. कृत्रिम रेतन करताना योग्य प्रजातींना चालना मिळेल, या संदर्भातील संशोधन याबाबतही त्यांनी विचारणा केली. दमस्कस शेळी करिता पुढील पिढीसाठी बोकडांची व्यवस्था कशा प्रकारे करायची या विषयावर यावेळी चर्चा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.