आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:आदित्य ठाकरेंना भेटण्यास विदर्भवाद्यांना केला मज्जाव, पोलिसांनी दिली न भेटण्याबाबतची नोटीस

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवार, २७ अाॅगस्टला शिवसेनेतर्फे आयोजित तान्ह्या पोळ्याकरिता येत आहेत. मात्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली असता नाकारण्यात आली. यामुळे विदर्भवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरेंसोबत विदर्भाचा अनुशेष, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, विकास आणि अन्य समस्यांसह विदर्भ राज्याच्या निर्मिती बाबत जनतेसमोर चर्चा करण्यासाठी, सक्करदरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कार्यक्रम स्थळ असल्याने व स्टेज हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने वेळ मागण्या संदर्भाने सक्करदरा व हुडकेश्वर या दोन्ही पोलिस स्टेशनला २५ ऑगस्टला पत्र दिले. त्यानुसार गोपनीय शाखेद्वारे तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक दीपक कापसे यांच्याशी मासुरकर यांची फोनवर चर्चा करून दिली. व आदित्य ठाकरे यांचा अचानक दौरा असल्याने भेट संभव नाही, असे मासुरकर यांना सांगण्यात आले.

सक्करदरा वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी शुक्रवारी मुकेश मासुरकर यांना पोलिस ठाण्यात बोलावून १४९ ची नोटीस दिली. आदित्य ठाकरे यांचे कार्यक्रम दिवसभर ठरवून असल्याने व त्यांना कोणत्याही प्रकारचा वेळ नसल्याने ते आपणास भेटू शकत नाही. तसेच मासुरकर यांनी ठाकरे यांच्याशी भेटण्याचा विचार करू नये. कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करू नये. आपल्या मागण्यांकरिता कायदेशीर व सनदशीर मार्गाचा अवलंब करावा अशी समजूत देऊन, असे न झाल्यास मासुरकर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये सांगितले गेले.

परंतु मासुरकर यांनी कायदेशीरच पोलिसांशी संपर्क साधून ठाकरे यांची भेट करून द्यावी याकरिता पत्र देऊन कळवले. उलट वेळ न देता आयोजक व प्रशासन स्वतः कायद्याची पायमल्ली करत असल्याचे मासुरकर यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांच्याजवळ विदर्भातील जनतेला भेटण्यासाठी वेळ नाही, मग विदर्भात ते आलेच कशाला? विदर्भ हा पिकनिक स्पॉट आहे का? असा सवाल मासुरकर यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...