आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ग्रामसभेच्या आवाहनानंतर सर्व पक्ष एकत्र, निवडणूक बिनविरोध; मुलीनेदिली सदस्यांना शपथ, १०० रुपयांच्या बाँडवर घेतली जनविकासाची हमी

नागपूर (अतुल पेठकर, एसआयटी)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भातील किन्ही गावात आगळ्या लोकशाहीचा पायंडा, मतभेदांना दिली मूठमाती

“गाव करी ते राव न करी’ या उक्तीची प्रचिती नुकतीच विदर्भात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीपासून ७ किमीवर असलेल्या किन्ही या गावात पक्षीय राजकारणाला उबगलेल्या गावाने एकत्र येत ग्रामपंचायत अविराेध निवडून दिली. एवढेच नव्हे तर ग्रामसभेच्या माजी सचिव कान्होपात्रा कुथे या मुलीने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेली शपथ ग्रामपंचायत सदस्यांना दिली. राज्यपाल वा राष्ट्रपती िवधानसभा वा लोकसभा सदस्यांना देतात त्याच पद्धतीने कान्होपात्रा कुटे यांनी सदस्यांना राम मंदिर देवस्थानच्या प्रांगणात ही शपथ दिली. आता गावात पक्षीय मतभेदांना मूठमाती देत विकासाचे वारे वाहत असल्याची माहिती सार्वभौम ग्रामसभा समन्वय समितीचे समन्वयक सहसंघटक भगवान प्रधान यांनी “दिव्य मराठी’ला दिली.

गावात मद्यपींचा धुमाकूळ, भांडणे, मारामारी नित्याचीच होती. त्यात पक्षीय राजकारणाने दुफळी माजलेली होती. गावाला यापासून रोखण्यासाठी सार्वभौम महिला ग्रामसभा समिती, सार्वभौम ग्रामसभा समन्वय समिती व किन्ही ग्रामवासी एकत्र आले. गीताचार्य तुकारामदादा यांच्या संकल्पावर चालण्याचा निश्चय समिती व ग्रामस्थांनी केला. ग्रामसभा बोलावून राजकीय पक्षांना स्पष्ट कल्पना देण्यात आली. यापुढे गावात राजकारण बंद, तुम्हीही सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले. ग्रामसभेला सीताराम देशमुख, नामदेव ठाकूर, रमेश मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण गाव एक झाल्याचे पाहून राजकीय पक्षांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्याच सभेत सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. लवकरच गावात वृक्षारोपणासह इतर उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

जनता जनार्दन मला जी शिक्षा देईल ती भोगण्यास सदैव तयार राहीन
ग्रामसभेने सर्व सदस्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जनसेवेची हमी लिहून घेतली व तशी शपथही घ्यायला लावली. मी माझ्या कर्तव्यात समाजविघातक किंवा बेदखल कृत्य केल्यास जनता जनार्दन मला जी शिक्षा देईल ती भोगण्यास सदैव तयार राहीन. करिता सर्वांच्या साक्षीने मी मौजा किन्ही गाव हे गाव गणराज्य करण्यासाठी शपथ घेत आहे... असा मजकूर या शपथपत्रात आहे.

बातम्या आणखी आहेत...