आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भवाद्यांचे आंदोलन:महाराष्ट्रदिनी शासकीय कार्यालयांच्या फलकावर चिकटवले विदर्भ राज्याचे स्टीकर, विदर्भ राज्य निर्मितीसाठी पाळला काळा दिवस

नागपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे १ मे हा महाराष्ट्रदिन काळा दिवस तसेच विदर्भाचा विश्वासघात दिवस म्हणून साजरा करण्यात आला. “महाराष्ट्र मिटाओ, विदर्भ मिलाओ’ आंदोलन करीत ५० च्या वर ठिकाणी विदर्भाचे स्टिकर लावण्यात आले.

यामध्ये जेथे महाराष्ट्र शासन लिहले होते, तिथे विदर्भ शासनाचे स्टीकर लावले. तसेच हाताला, डोक्याला काळी फित बांधून गांधी पुतळा, व्हेरायटी चौक येथे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

समिती कार्यकर्त्यांनी ३० एप्रिल रोजी पहाटेच विदर्भाचे स्टिकर लावून टाकले होते. त्यामुळे सकाळी लोकांना अचानकच महाराष्ट्र ऐवजी विदर्भ शासन असे लिहिलेले दिसून आले. शहरात तेलंगखेडी परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी पशु व मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, सिव्हिल लाईन येथील महालेखाकार कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विभाग, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शिक्षण मंडळ, कृषी विभाग, जिल्ह्यातील भूविज्ञान व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे संघटना महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त यांचे कार्यालय आदि ५० च्या वर कार्यालयातील फलकावरील व रोडच्या पलीकडील फलकावरील महाराष्ट्र शासन लिहिलेल्या जागी विदर्भ शासनाचे स्टिकर लावण्यात आले. विधान भवनावरही बॅनर (फ्लेक्स) लावण्यात आले होते.

व्हेरायटी चौकातील निदर्शनांमध्ये आंदोलकांनी महाराष्ट्र सरकार व मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. यावेळी पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार यांनी यापुढेही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. सोबतच शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आंदोलनातून जेलमध्ये जायला आमचा कार्यकर्ता तयार असल्याचे सांगितले. युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी २८ सप्टेंबर १९५३ ला झालेल्या नागपूर करार हा असंवैधानिक असल्याचे सांगितले.

यावेळी आंदोलनात अविनाश काकडे, विष्णू आष्टीकर, प्रभाकर कोंडबत्तुनवार, नरेश निमजे, सुधा पावडे, अनिल बोबडे, भूषण राऊत, सुनीता येरणे, रेखा निमजे, ज्योती खांडेकर, उषा लांबट, विना भोयर, गुलाबराव धांडे, अरविंद भोसले, गणेश शर्मा, भारत बाविष्टाले, प्यारूभाई उर्फ नौशाद हुसेन, संगीता आंबारे, राजेंद्र सतई, प्रशांत तिजारे, प्रशांत तागडेंसह शेकडो विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. चिखली कोषागार कार्यालयाला लावण्यात आलेले विदर्भाचे स्टीकर.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बुलडाणा जिल्हा शाखेच्या वतीने १ मे रोजी काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी तहसीलदारांच्या मार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन पाठवून त्यामध्ये विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्रातून विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, महाराष्ट्रात राहून सतत विदर्भावर अन्याय होत आहे. यासाठी विदर्भ राज्य करण्यात यावे. या मागणीसाठी १ मे रोजी काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांच्या गाडीवर महाराष्ट्र ऐवजी विदर्भ शासन व विदर्भ कोषागार, विदर्भ असे स्टीकर लावून आंदोलन केले. या आंदोलनात बुलडाणा जिल्हा समन्वयक तेजराव मुंढे, शेतकरी संघटना प्रदेश कार्यकारिणी सदस्य समाधान कणखर, जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, नामदेवराव जाधव, भिका सोळंकी, शेषराव शेळके, मुरलीधर येवले यांनी सहभाग घेतला.

चिखली कोषागार कार्यालयाच्या बोर्डावर लावले ‘विदर्भ’चे स्टीकर
नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्रदिनी आंदोलन केले. यामध्ये शहरातील विविध कार्यालयाच्या फलकावर ‘विदर्भ’ स्टीकर चिकटवले.

बातम्या आणखी आहेत...