आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती विशेष:विनोबांचा काळ माणसाला अन् निसर्गाला महत्त्व देणारा

वर्धा / आशिष पावडे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकासाच्या नावावर आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार या गावातील शेकडो वृक्ष आजवर तोडले गेले

विनोबा भावे यांच्यामुळेच वर्धेची गांधी जिल्हा म्हणून ओळख झाली. गांधींजी आणि विनाेबांचे ध्येय सारखेच हाेते. त्यांना सामान्य माणसाला समृद्ध करायचं हाेतं. विनोबांच्या काळात माणसाला अन् निसर्गाला महत्त्व हाेतं. त्याच विनाेबांच्या गावात विकासाच्या नावावर वृक्ष तोडत असल्याचे दु:ख त्यांच्या शिष्यांना आहे.

गांधीजी अन् विनाेबा यांनी विचारांमधून शिका, पुतळे उभारणीतून काहीही सिद्ध होत नसल्याची शिकवण दिली. विनोबा तर सतत सांगायचे, ‘अन्न, वस्त्र, निवारा, राेजगार, आरोग्य, शिक्षण अन् माणुसकी ही रत्ने ज्यांना मिळाली ताेच खरा विकास.’ त्यांना आदर्श गाव (जिल्हा) बनवायचे होते. परंतु आता विकासाची संकल्पना बदलत आहे. विकासाच्या नावावर हजाराे वृक्ष तोडून काँक्रीटचे जंगल उभे करत आहेत. विनोबांना शोषणमुक्त समाज हवा होता. मात्र जातिभेद निर्माण करून विकास करताहेत, जो विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. विनोबांनी ग्रामदान व भूदान चळवळ उभी करत जो जमीन कसणार तोच मालक होणार, असे सांगितल्याचे बाल विजय यांनी सांगितले. वर्धेतील विकास हा विनोबा भावे व महात्मा गांधीजींच्या नावाने होत आहे. त्यांना जो विकास हवा होता तो विकास त्या दिशेने होत नसल्याचे गांधी विचारक व विनोबांच्या सहवासातील अनुयायांनी सांगितले. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत महात्मा गांधी व विनोबा भावे यांचा भव्य पुतळा वाहनांचे निकामी भाग असलेल्या वस्तूंपासून बनवण्यात येत आहे. विचारांचा प्रसार हा आचारातून होतो, असे गुरू-शिष्य म्हणायचे. आता तर विकासाच्या नावाखाली त्यांचे पुतळे बांधले जात आहेत. प्रदूषण वाढवून विकास हा मुळीच पर्याय नसल्याचे करुणा फुटाणे म्हणाल्या. बापू व विनोबा म्हणायचे, गावाकडे चला. आता कोरोनामुळे नागरिक शहरांमधून गावाकडे येत आहेत. देश स्वतंत्र झाला, पण गावे शहरांवर अवलंबून आहेत. त्यामुळे विकास करायचा असेल तर गावाचा करा, असे करुणा फुटाणे म्हणाल्या.

बापू कुटी व पवनार आश्रमातून प्रेरणा मिळते
बापूंच्या सेवाग्राम व पवनार येथील विनोबांच्या आश्रमात प्रेरणा मिळते. विकास करायचा असेल तर नागरिकांना या सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत रोजगार उपलब्ध करून द्यावा, तोच खरा विकास महत्त्वाचा ठरू शकतो. - करुणा फुटाणे, अध्यक्ष, ग्रामसेवा मंडळ गोपुरी, वर्धा.

विनोबांच्या सेवेत घालवली १५ वर्षे
विनोबा भावे जगभरात पायी प्रवास करायचे. ग्रामदान भूदान ही चळवळ सुरू असताना १९५१ मध्ये माझी भेट झाली. १५ वर्षे विनोबांच्या सहवासात मी वाढलो आहे. माझा जन्म नागपूर येथे झाला. त्यानंतर शिक्षणाकरिता बाहेर जावे लागले. आता विनोबांच्या आश्रमात राहून आध्यात्मिक मंथन सुरू आहे. - बाल विजय, विनोबांचे शिष्य, पवनार आश्रम, वर्धा.

नागरिकांनी जागरुकता दाखवणे गरजेचे : पर्यावरण गेले, झाडं गेली, धाम नदीचे मोकळे तीर गेले, नदीतले काळे दगड गेले. सुशोभीकरण आले. या सुशोभीकरणात ३०० काेटींचा प्रोजेक्ट आला. परंतु ज्या वास्तू वारसाहक्काने आपल्याकडे सोपवल्या त्यांचे आपण बाजार मांडले. त्यामुळे नागरिकांनी जागरूक हाेण्याची गरज आहे. - आलोक बंग, चेतना विकास आलोडी, वर्धा.

बातम्या आणखी आहेत...