आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर करणार 2500 किलोंचा महाप्रसाद:वीजेच्या उपकरणांचा वापर न करता पारंपरिक पद्धतीचा करणार अवलंब

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या घरोघरी आरत्यांचे सूर, गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी ओसंडून वाहणारी गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा केलेली आकर्षक रोषणाई असे आनंद, उत्साह आणि भक्तीमय वातावरण आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उद्या बुधवारी 7 सप्टेंबर रोजी हा आनंद आणि उत्साह द्विगुणीत करणार आहे. अमृत भवन, सीताबर्डी येथे उद्या सकाळी 9 वाजता ते 2500 किलोचा सातळलेल्या डाळीचा महाप्रसाद तयार करणार आहे.

विशेष म्हणजे हा महाप्रसाद संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. महाप्रसाद तयार करतांना वीजेवर चालणाऱ्या उपकरणांचा उपयोग केला जाणार नाही असे विष्णू मनोहर यांनी सांगितले. अगदी धने पावडरही धणे कुटून तयार केली आहे. भाज्या चिरून, खोबरे किसून व मसाले कुटुन ठेवण्यात येणार आहे. महाप्रसादासाठी लागणारी तयारी पूर्ण करूनच सुरूवात केली जाणार असल्याचे मनोहर यांनी सांगितले.

सुरेल स्वरांची साथ लाभणार

पारंपरिक पद्धतीने तयार केलेला महाप्रसाद देवाला पावतो तसेच स्वादिष्ट, रूचकर आणि पाचक होतो असे मनोहर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सर्व नागरिक उपस्थित राहू शकतात. सोबतच हा महाप्रसाद बाप्पांच्या भक्तांना वितरित केल्या जाईल अशी माहिती येथे जारी केलेल्या निवेदनातून दिली आहे. भक्तीमय कार्यक्रमात विष्णू मनोहर यांच्या महाप्रसादाला प्रसिद्ध भजन गायक कमलेश पांडे यांच्या सुरेल स्वरांची साथ लाभणार आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

या सोबतच ढोलताशांचा जल्लोषही राहणार आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा तसेच नागपूरकरांनी या महाप्रसादाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती मनोहर यांनी केली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेडिओ पार्टनर माय एफएम, व्हेन्यू पार्टनर अमृत भवन, ट्रॅव्हल पार्टनर एमडी ट्रॅव्हल आणि विश्वा ट्रॅव्हल, फिल्म प्रोडक्शन आकार फिल्म्स यांनी पुढाकार घेतला असून नागपूरकरांच्या उत्साही उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

यापूर्वीही विविध विक्रम

वेगवेगळे विक्रम करणे हा विष्णू मनोहर यांचा छंद आहे. सलग 53 तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. तीन तासात 7 हजार किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. तसेच 3200 किलो वांग्याचे भरीत, 3 हजार किलो खिचडी तयार करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नंतर एका भांड्यात 5 हजार किलो खिचडी दलिया शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

बातम्या आणखी आहेत...