आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने मागील सरकारच्या कामांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृह 11.30 वाजता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदा 10 मिनिटांसाठी तहकूब केले.
आम्ही सात सात वेळा निवडून आलो. अनेक सरकारे पाहिली. पण असे स्थगिती सरकार पाहिले नाही असा आरोप पवार यांनी केला. व्हाईट बुकमध्ये आलेल्या कामांनाही स्थगिती देण्यात आली. हे चांगले नाही असे अजित पवार यांनी सांगितले.
त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच कामांना स्थगिती दिली नसल्याचे सांगितले. तुम्ही सातवेळा निवडून आला. आम्ही कमी वेळा निवडून आला. पण आम्ही तुमच्याकडूनच हे शिकलो असा टोला फडणवीस यांनी हाणला. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या काळात भाजपाच्या लोकांना एक नवीन पैसा दिला नाही. अनेक चांगल्या कामांना स्थगिती देण्यात आली, असा आरोप फडणवीस यांनी केला. आम्ही 70 टक्के स्थगिती उठवली असून फक्त 30 टक्के स्थगिती कायम आहे. आमदनी अठन्नी आणि खर्चा रूपय्या असे चालणार नाही. या दरम्यान विरोधकांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी सुरू केली. "नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी', "ईडी सरकार हाय हाय', "स्थगिती सरकार हाय हाय'च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.
या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला. विरोधकांचा गोेंधळ सुरू असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी "पन्नास खोके एकदम ओक्के'च्या घोषणा दिल्या. गोंधळा दरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास झाल्यावर बोलायला संधी देतो असे सांगूनही विरोधकांचा गोंधळ सुरू होता.
या गोंधळा दरम्यान काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार, अमीन पटेल यांनी मुंबईच्या रूग्णालयातील पदभरतीचा प्रश्न उपस्थित केला. यावरून विरोधकातील विरोधाभास दिसून आला. समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी शताब्दी हाॅस्पिटलचा प्रश्न उपस्थित केला. 11.30 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच तालिका सभापती समीर कुणावार यांनी पहिल्यांदा सभागृह 10 मिनिटांकरीता, दुसऱ्यांदा 15 मिनिटांसाठी आणि तिसऱ्यांदा परत 10 मिनिटांसाठी तहकूब करीत असल्याचे जाहीर केले.
तालिका सभापतीनंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर आसनस्थ झाले. त्या नंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार चालवित असताना विरोधी पक्षालाही मदत झाली पाहिजे. सरकार चालवित असताना भेदभाव व्हायला नको असे सांगितले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षनेते व गटनेत्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर सभागृहाचे नियमित कामकाज सुरू झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.