आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दोन दिवसांत विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला सुरुवात होईल. रवीनगर परिसरातील बंगल्यांच्या रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत. अधिवेशनाची कामकाज पत्रिका तयार झाली असून दोन आठवड्यांचे कामकाज आहे. सुट्या धरून एकूण ९ दिवसांचे काम दरवर्षी होते.
२०१९ मध्ये झालेल्या अधिवेशनाच्या तयारीवर एकूण ६८ कोटी रुपये खर्च झाले होते. या वर्षी अधिवेशनावर ९८ कोटींवर खर्च होणार असल्याची माहिती आहे. गेल्या अधिवेशनापेक्षा ३० कोटी रुपयांनी हा खर्च वाढू शकतो. दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन अधिवेशन होऊ शकले नाहीत. आघाडीच्या दुसऱ्या वर्षाच्या काळात कोरोना ओसरला होता. तेव्हा अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबईत झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुढील अधिवेशन नागपूरला होईल, अशी घोषणाही विधानसभा अध्यक्षांनी केली होती.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली पाहणी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच हिवाळी अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत नागपूरला होईल, असे सांगितले होते. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर नागपूरला येऊन गेले. त्यांनी पाहणी केली आणि बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामांना सुरुवात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.