आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मदतीमुळे धीराने उभे राहून संकटांवर केली मात, एकल मुस्लिम महिलेने मोहरमच्या दिवशी सुरू केल ब्युटी पार्लर

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनात अनेकांना आपले आप्त स्वकीय, जवळचे मित्र, नातेवाइक गमवावे लागले. कोणी आईवडील, कोणी आपला पती तर कोणी पत्नी गमावली. अशावेळी गरज असते आधाराची. एका मदतीच्या हाताने आणि आधाराने अनेकांची आयुष्य नव्याने उभी राहिली, दुःखावर मात पुन्हा सुरू झाली. पुण्यातील एक मुस्लिम एकल महिला तिला मिळालेल्या मदतीमुळे धीराने उभी राहिली. मोहरमच्या दिवशी तिने स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू केलं. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या ग्रुपने तिला तिचं आयुष्य नव्याने सुरू करण्यात मदत केली.

पुण्याचे विक्रम देशमुख, टाटा मोटर्सचे अलिफ शेख यांचा ग्रुप व मुंबईच्या चारुता मालशे यांनी मिळून ७३ हजारांची मदत केली. नाजमीन ही मुस्लिम एकल महिला तिचा नवरा आणि मुलाच्या मृत्यूने कोलमडून गेली होती. तिचा नवरा कायद्याची पुस्तके कोर्टात विकत होता. त्यात त्याला कोरोनाची लागण झाली. त्यात तो मरण पावला. उपचारासाठी खूप खर्च झाला. आधी घेतलेल्या फ्लॅटचे १६ लाख कर्ज असताना पतीच्या उपचाराचे कोरोनात ९ लाख बिल झाले. फ्लॅटवर जप्तीच्या नोटिसा येऊ लागल्या. त्यातच १३ वर्षाच्या मुलाला रक्ताचा जीबी नावाचा एक असाध्य आजार झाला. त्याचेही ७ लाख बिल झाले. सुभाष वारे, राजेंद्र बहाळकर, मयुर बालकृष्ण बागुल यांनीही तिला मुलांच्या आजारात धीर दिला, पण त्या मुलाचा मृत्यू झाला.

६ महिन्यात घरात दोन मृत्यू झाल्याने ती कोलमडून पडली. डिप्रेशनमध्ये गेली. सासरच्या लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. माहेरी काही काळ राहिली. तिच्यात ब्युटी पार्लरचे कौशल्य होते. ते सुरू केले तर कर्ज फिटायला मदत होईल व ती दुःखातून बाहेर येईल असे तिला सगळ्यांनी समजावले. त्यानुसार गोळा करायला सुरुवात केली. विक्रम देशमुख, अलिफ शेख ,चारुता मालशे यांच्या मदतीने ७३००० जमवले.

जवळपास ३ महिने अनेकांशी बोलून पाठपुरावा केला. विनित धारणकर, जयदीप मोहिते यांनी काही संपर्क करून दिले. त्यातून अपेक्षित मदत उभी राहिली. आपण अजून तिला भेटलोही नाही. पण सुखदुःख एकमेकांशी वाटून घ्यावे असे भावबंध आमच्यात तयार झाले असे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले. ब्युटीपार्लर सुरू करून मुस्लिम एकल महिला भगिनी स्वावलंबी झाली, याचा आनंद असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

एकल महिलेने सुरू केलेले ब्युटीपार्लर.

बातम्या आणखी आहेत...