आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी विरोधातील भाजपच्या मदतीने सत्तेत भागीदारी मिळवली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपच्या नाराज गटाच्या मदतीने अध्यक्षपद मिळवले, तर गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना धक्का देत भाजपच्या मदतीने सत्तेत वाटा मिळवला. गोंदियात अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळूनही काँग्रेसवर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे.
भंडाऱ्यात काँग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. विजयी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना २७, तर विरोधकांना २५ मते मिळाली. काँग्रेसकडून गंगाधर जिभकाटे हे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या वाघमारे गटाचे संदीप टाले हे विजयी झाले. अध्यक्षपदासाठी उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश ब्राह्मणकर यांना २५, तर काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांना २७ मते मिळाली. उपाध्यक्षपदाचे भाजपचे प्रियांक बोरकर यांना २५, तर भाजपचे वाघमारे गटाचे संदीप टाले यांना २७ मते मिळाली. एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादात भंडारा जिल्ह्यात नव्या युतीचे समीकरण पुढे आले आहे.
सभागृहात धक्काबुक्की
भंडाऱ्याच्या सभागृहात भाजपचे दोन्ही गट एकमेकांवर भिडले. यात काँग्रेसचे काही सदस्य चालून आल्याने सभागृहातच धक्काबुक्की व चांगलीच हाणामारी झाली. यात भाजपच्या एका महिला सदस्याचे मंगळसूत्र तुटले, तर ३ सदस्यांचे शर्ट फाटल्याने या निवडणुकीला गालबोट लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.