आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापदवीचे शिक्षण घेत असतानाच सरपंचपदाची माळ गळ्यात पडलेल्या भाग्यश्री लेकमी या अवघ्या बावीसवर्षीय तरुणीने गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोठीच्या गट ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण ९ गावांच्या कारभाराचा गाडा हाकताना वर्षभरातच कायापालट केला आहे.
२३ मार्च २०१९ राेजी तिची बिनविरोध निवड झाली. तेव्हापासून तिने गावाच्या विकासावर साचलेली वर्षानुवर्षांची धूळ झटकायला सुरुवात केली. भामरागड तालुक्यातील कोठी हे गाव तालुका मुख्यालयापासून साधारण २३ किलोमीटर लांब आहे. कोठीसह इतर ९ गावांमध्ये विकासाची कामे करणे तसे अवघडच. दररोज भामरागडला जाऊन भाग्यश्रीला शासकीय कामाचा पाठपुरावा करावा लागतो. तिच्या अधिकारात आजूबाजूच्या ९ गावांत मिळून ११२ मुली आहेत. त्यांना सॅनिटरी पॅड देणे, कॅल्शियमच्या गोळ्या देणे अशी आरोग्याची काळजी तिला घ्यावी लागते.
१४ वर्षांनंतर मिळाला सरपंच : मरकनार गावात वास्तव्यास असलेल्या भाग्यश्रीची आई राजश्री ही अंगणवाडी सेविका असून वडील कोठी येथील जि.प.शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. भाग्यश्री सध्या बी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत आहे. सन २००५ ते २०१९ पर्यंत १४ वर्षे कोठी गावाचा कारभार ग्रामसेवक आणि सचिवामार्फत चालत होता. निधीच्या अफरातफरीच्याही चर्चा होत्या. अखेर गतवर्षी ९ गावांतील ग्रामस्थांची बैठक झाली अन् त्यात तरुण, उत्साही भाग्यश्रीची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
वर्षभरात असा केला कायापालट
इंदिरा आवास योजनेअंतर्गत ८० कुटुंबांसाठी घरकुल मिळवले. कोठी गावात ३५ घरांसाठी शौचालय बांधकामाची मंजुरी मिळवली. आदिवासी दुर्गम भाग असल्याने गावात वीज नव्हती. भाग्यश्रीने पाठपुरावा केल्याने काही गावांमध्ये वीज पोहोचली. ३-४ गावांमध्ये सिमेंट रस्ते तयार केले. पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना कार्यान्वित केली. मोडकळीस आलेल्या अंगणवाड्यांची दुरुस्ती केली. आता वीज पोहोचलेल्या गावातील अंगणवाड्यांमध्ये टीव्ही आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचा मानस आहे, असे भाग्यश्रीने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.