आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंस्कृत सखी सभा, नागपूरच्यावतीने रविवारी आयोजित विक्रमी अशा संपूर्ण (अठरा अध्यायी) श्रीमद्भगवद्गीता पठण महावाग्यज्ञात सुमारे चार हजार महिलांनी एकाच वेळी गीता पठण केले.
यावेळी सकारात्मक उर्जा प्रवाहित झाली होती. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमाननगर येथे आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात रविवारी भारावलेले वातावरण होते. साहित्य, कला, संस्कृती, परंपरांनी नटलेल्या या महोत्सवाला त्यानिमित्ताने आध्यात्मिक व वैज्ञानिक आयाम जोडला गेला.
या सामूहिक गीतापठण महायज्ञात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, भंडारा, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा इत्यादी तसेच, हैदराबाद, बंगलोर, मंगलोर, इंदोर, रायपूर येथील महिलांनी देखील या उपक्रमासाठी नोंदणी केली होती. विविध भागातून सुमारे 4 हजार महिला या गीतापठण उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. अनेक शाळा व महाविद्यालयांचा देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी होत्या. संयोजिका डॉ. विजया विलास जोशी आणि समन्वयिका सोनाली अडावदकर आहेत.
महायज्ञातील ध्वनीलहरींचा होणार अभ्यास यज्ञादरम्यान उच्चारण्यात येणाऱ्या मंत्रांच्या ध्वनीलहरीमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, असे म्हटले जाते. ही बाब वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी गीतापठण महायज्ञादरम्यान सामूहिकरित्या उच्चारल्या जाणाऱ्या श्लोकांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरींचे मापन केले जाणार आहे. जळगावचे ध्वनिलहरी अभ्यासक व संशोधक अविनाश आणि आकांक्षा कुळकर्णी हे दांपत्य कार्यक्रमादरम्यान उत्पन्न होणाऱ्या ध्वनी लहरींचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणार आहेत. नव्या पिढीला यामुळे श्रीमद्भगवद्गीतामहात्म्य जाणून घेता येणार आहे.
संस्कृत शिक्षिका व अभ्यासक डॉ. विजया विलास जोशी यांच्या मार्गदर्शनात सहा वर्षांपूर्वी संस्कृत भाषेच्या अभ्यासक, शिक्षिका, विद्यार्थिनी, संस्कृतप्रेमींसाठी संस्कृत सखी सभा, नागपूर हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. यात दररोज संस्कृत वचने, श्लोक, गीते, काव्य, कथा, सुभाषिते यांचे आदानप्रदान होत असते. याशिवाय, स्त्रोत्रपाठान्तर, कथानुवाद, संस्कृत स्वगत यासारख्या विविध स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात येते.
दरवर्षीची कालिदासदिन साजरा करणारी संस्कृत अन्त्याक्षरी स्पर्धा हा तर सभेचा गाजलेला वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. यावर्षी गीतापठन महायज्ञाची संकल्पना समोर आली. त्यात सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढत गेली आणि संस्कृत सखी सभेचा हा प्रवास देशभरात लोकप्रिय ठरलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचापर्यंत येऊन पोहोचला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.