आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष:नक्षल्यांनी ज्या गावात वडिलांची हत्त्या केली, त्याच गावात डाॅक्टर होऊन परतल्या भारती

अतुल पेठकर | नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोर्डाची परीक्षा असल्याने घरी परीक्षेचे परीक्षेमुळे येणाऱ्या तणावाचे वातावरण होते. भारती बोगामी तेव्हा फक्त १७ वर्षांची होती. बोर्डाच्या परीक्षेच्या एक दिवस आधी तिच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. एखादी मुलगी उन्मळून पडली असती. पण, बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेत भारती बोगामी डॉक्टर झाली आणि आज त्याच गावात सेवा देत आहेत.

२००२ मध्ये भारती विज्ञान शाखेत शिकत होती. बारावीच्या पेपरच्या एक दिवस अगोदर गडचिरोलीच्या लाहेरी गावात सरपंच आणि काँग्रेस नेते मालू बोगामी यांना दिवसाढवळ्या ठार करण्यात आले. पुढे भारतीला हाडांचा ट्युमर झाला. त्यातूनही ती वाचली. अशावेळी बाबा आमटे तिच्या आयुष्यात दीपस्तंभ होऊन आले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत भारती बोगामी मेहतनीच्या जोरावर चक्क ‘डॉ. भारती बोगामी’ झाली.

२०११ मध्ये बीएसडीटी आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथून बीएएमएस पोस्ट इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर सुखासीन आयुष्य लाथाडून भारतीने आदिवासींची सेवा करण्यासाठी गाव गाठले. पुण्यात जाताना एकटी गेलेली भारती गावात परतताना मात्र आपले डॉक्टर पती सतीश तिरंकर यांनाही सोबत घेऊन आली. आज हे दोघेही हजारो आदिवासींची निस्वार्थ सेवा करत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील काही दुर्गम आदिवासी गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी डॉ. सतीश हे भारती यांच्यासोबत काम करतात.

हे डॉक्टर दाम्पत्य आता मारकनार उपकेंद्रात काम करत आहे. यात आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सात गावांचा समावेश आहे. या पीएचसीच्या अखत्यारीत ५२ गावे आहेत. परंतु काही उपकेंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे जोडपे या अतिरिक्त गावांतील रुग्णांवर उपचार करतात. डॉ. भारती या माडिया जमातीतील आहेत. त्या म्हणतात, बाबा आमटे, प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या प्रेरणेमुळे हाडांच्या ट्युमरवर मी मात करू शकले. बाबा आमटेंनी “भूतकाळातून शिक आणि पुढे जा’ असा मंत्र दिला. आज याच मंत्राच्या आधारे आम्ही दोघे सेवा देत आहोत.

७० ते ८० किमी बाइकवरून प्रवास
भारतींनी सांगितले, नक्षल्यांनी वडिलांना मारले तेव्हा मी अहेरीला होते. मला लाहेरीला जायचे होते. बाईकवरून ७० ते ८० किमी निघाले. गावात पोहोचले तेव्हा वडिलांचा मृतदेह यायचा होता. तो झाडालाच लटकत होता. आई म्हणाली “बाळा, बाबा तर परत येणार नाही. तू जा आणि पेपर दे’ तशीच परत निघाले. वाटेत बाबा आमटे भेटले. त्यांनी आधार दिला.

संध्याकाळी येतो म्हणून गेले, आलेच नाहीत...

आई प्राथमिक शिक्षिका होती. बाबा गेल्यावर तिला पॅराॅलिसीस झाला. आश्रमशाळेत शिक्षण झाल्यावर अकरावीत असताना अहेरीत निवडणूक काळात नक्षल्यांनी वडिलांना जीपमध्ये नेले. नेलगुंड्याजवळ उतरवून अर्जुनाच्या झाडाला बांधून मारले. बाबांनी निघण्यापूर्वी बेस्ट लक दिले. “संध्याकाळी भेटायला येतो’ असे सांगितले. नंतर ते आलेच नाहीत.

बातम्या आणखी आहेत...