आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Yes T shirt | Nagpur | Sport | Player Data Can Now Be Measured While Playing; Nagpur Is The First University In The Country To Use Indigenous Yes T shirt

दिव्य मराठी विशेष:आता खेळता खेळता मोजता येईल खेळाडूचा डेटा; स्वदेशी यॉस टी शर्ट वापरणारे नागपूर देशातील पहिलेच विद्यापीठ

अतुल पेठकर | नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या खेळांतील खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसह इतरही डेटा आता खेळ खेळतानाच संकलित करणे शक्य झाले आहे. मेक इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या स्वदेशी यॉस टी शर्टचा उपयोग करून असा प्रयोग करणारे नागपूर विद्यापीठ हे देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

विद्यापीठाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मदतीने निवडलेली एक्सलन्स सेंटरची मुले येथे प्रशिक्षण घेत आहेत. पुढील आठ वर्षांनंतर येणाऱ्या ऑलिम्पिकची तयारी या मुलांकडून करून घेण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक शरद सूर्यवंशी यांनी दिली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सराव आणि विश्लेषण करणे आवश्यक असते. याचकरिता विद्यापीठाच्या खेलो इंडिया सेंटरसाठी स्पोर्टस किट मागवत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. खेळताना खेळाडूंची शारीरिक क्षमता किती आहे, त्यांच्या हालचाली किती चपळ आहे, ते किती वेळ टिकतात अशा अनेक गोष्टींचा डेटा यॉसमुळे जमा होतो.

प्रशिक्षकाला कोर्टाच्या वा मैदानाबाहेर थांबून एका अडथळ्यापासून दुसऱ्या अडथळ्यापर्यंत जाण्यास खेळाडूला किती वेळ लागला हे मोजता येईल. लांब उडीत कुठल्या पायाला टेकऑफ बोर्ड यायला पाहिजे अशा अनेक गोष्टी यात आहे. किती कॅलरीज बर्न झाल्या, ईसीजी आदी गोष्टी यामुळे कळणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

एकूण आठ किटस् आम्ही मागवल्या आहे. बॅडमिंटन, हॅण्डबॉल, अॅथलेटिक्स आणि बॉस्केटबॉल या चार खेळांचे केंद्र आहेत. त्यासाठी हे किट्स खरेदी केले असून साईचे प्रशिक्षित प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत होते. परंतु स्थानिक स्तरावर अशा प्रकारचा प्रयोग करणारे नागपूर विद्यापीठ पहिलेच असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग विभागाने बनवले चिप लावलेले टी शर्ट
शिशिर त्यागी हे केंद्राच्या वुल रिसर्च असोसिएशन कंपनीत कार्यरत आहेत. कमला टेक या कंपनीसोबत मिळून हे यॉस टी शर्ट तयार झाले. हे धावपटूसाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते म्हणाले, आजवर अशी महागडी उपकरणे आयात व्हायची. आता मेक इन इंडियात तयार उपकरणांतर्गत ईसीजी इलेक्ट्रो कार्डियोग्राम, हार्ट रेट, स्टेप काउंटर आदी डेटा संकलित होते. आयातीत उपकरण ५० हजार रुपयांना येते. आम्ही स्टार्टअप सोबत विकसित केल्यामुळे साधारणत: १५ हजारांपर्यंत किंमत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...