आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्तीचा पॅटर्न राबवला जात आहे, पण ग्रामीण भागात सर्रासपणे कॉप्या सुरू असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (३ मार्च) इयत्ता बारावीच्या गणित व संख्याशास्त्राच्या पेपरला कंधारमधील एका केंद्रावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने अकरा कॉपीबहाद्दरांवर करवाई केली. नांदेड शहरातील परीक्षा केंद्रावर कॉपीला ब्रेक लागला असला तरी ग्रामीण भागात सर्रासपणे कॉप्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी कंधार तालुक्यातील चिखली येथील एका परीक्षा केंद्रावरील कॉप्या पुरवणाऱ्या काही जणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शुक्रवारी बारावीच्या गणित व संख्याशास्त्राचा पेपर होता. शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत डिग्रसकर यांच्या पथकाने कंधारमधील गांधीनगर येथील पोस्ट बेसिक ज्युनियर कॉलेजला भेट दिली. या केंद्रावर गणिताच्या पेपरला १४५ पैकी १४४ विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी परीक्षा केंद्रावर कॉपी करताना ११ कॉपीबहाद्दरांना पकडले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. परीक्षेचा त्या विषयाचा निकाल किंवा प्रकरण किती गंभीर आहे हे पाहून त्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स रद्द करणे, एक परीक्षेसाठी बसण्यास मनाई करणे अशा प्रकारची शिक्षा केली जाते, असे शिक्षण विभागाने सांगितले. दरम्यान, कॉपी प्रकरणात शिक्षक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद नाही. परंतु, पोलिस प्रशासनाने चिखली केंद्रावर जमावातील सात जणांवर गुन्हे नोंदवले आहेत. यापूर्वी शिक्षण विभागाने पाच जणांवर कारवाई केली होती. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्याची घोषणा करण्यात आली. परंतु नांदेडसह मराठवाड्यातील जालना, परभणी जिल्ह्यात कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आल्याने हे अभियान फोल ठरल्याचे बोलले जात आहे.
३०२ विद्यार्थ्यांनी मारली दांडी बारावीच्या परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. शुक्रवारी गणिताच्या पेपरला एकूण १२ हजार १५० विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ८४८ उपस्थित, तर ३०२ अनुपस्थित होते. कॉपी करता येत नसल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी परीक्षेकडे पाठ फिरवत असल्याचे तज्ज्ञांमधून सांगितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.