आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात 1500 कोटींची कोचिंग फॅक्टरी!:नीट, जेईईचे 60 वर क्लासेस; 5 वर्षांतच 50 हजार विद्यार्थी अन् 125 हाॅस्टेल्स

विठ्ठल सुतार | लातूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूरच्या मध्यवर्ती शिवाजी चौकातून अर्धा किमी पुढे गेलो तर वेगळंच शहर आपल्याला दिसतं. तब्बल २६ एकरांवर वसलेला हा "ट्यूशन' एरिया. गेल्या ५ वर्षांत नव्याने जन्माला आलेला. पहाटे साडेपाचपासून या ट्यूशन एरियाची गजबज सुरू होते ती रात्री दहापर्यंत. याच ट्यूशन एरियातील साठेक कोचिंग क्लासेस, तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांची सोय करणारी १२५ होस्टेल्स, तेवढ्याच खानावळी व दरवर्षी ५ हजार डॉक्टर्स घडवणारे, लाखात पगार घेणारे प्राध्यापक व कोट्यवधींची उलाढाल करणारे कोचिंग क्लासेस अशी येथील वार्षिक उलाढाल दीड हजार कोटींच्या वर जातेय. गेल्या १० वर्षांत ती दुप्पट वाढली आहे.

लातूरची लोकसंख्या आहे ५ लाख, पण बाहेरून येणाऱ्यांची संख्या आहे त्यापेक्षा दुप्पट. महाराष्ट्रातील "कोटा' म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या येथील ट्यूशन एरियात ६० हून अधिक कोचिंग संस्था उभ्या आहेत. नीट, जेईई परीक्षांच्या तयारीसाठी ५० हजारांहून अधिक विद्यार्थी राहाताहेत. क्लासेसची संख्या मोठी दिसत असली तरी मक्तेदारी ८-१० मोठ्या कोचिंग क्लासेसचीच आहे. कोचिंग क्लासेसचे अर्थकारण आणि येथील स्पर्धा एवढी तीव्र आहे की त्यातून २०१७ मध्ये एक खूनही झाला होता. वसतिगृहे, खानावळी बनला प्रमुख व्यवसाय : ट्यूशनच्या थेट उत्पन्नासोबत त्याभोवती येथे अर्थकारणाचा मोठा परीघ तयार झाला आहे. होस्टेल्स आणि मेसचा जोडधंदा तेजीत आहे. येथील स्थानिकांनी आपल्या घरांची होस्टेल्स करून उत्पन्नाचा आकडा वाढवलाय, तर अनेकांनी नोकऱ्यांना रामराम करीत बाहेरून येणाऱ्या या मुलांना सेवा पुरवणारा मेसचा वा तत्सम व्यवसाय सुरू केला आहे. आता तर पालकही मुलांसोबत येथे येेऊन राहू लागल्याने घरांची भाडीही दुप्पट झाली आहेत. एका विद्यार्थ्यास ट्यूशन फी पडते साधारण एक ते दीड लाख आणि होस्टेल आणि मेसचे तेवढेच अधिक. म्हणजे एका विद्यार्थ्यामागे वार्षिक दोन ते अडीच लाखांची उलाढाल. असा येथल्या वार्षिक उलाढालीचा अंदाज तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचलाय. दरवर्षी एकट्या लातुरातून ५ हजारांहून अधिक विद्यार्थी डॉक्टर बनतात.

कॉफी शॉप्स व ब्रँडेड शोरूम्स : बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे ब्रँडेड कॉफी शॉप्स आणि कपडे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, सलून आदी वस्तू व सेवांनीही हे मार्केट अचूक घेरले आहे. भोवतालच्या जिल्ह्यात पाहायला मिळणार नाहीत, असे ब्रँडचे आऊटलेट्स येथे दिवसागणिक उगवू लागले आहेत. त्यांची उलाढाल तर वेगळीच.

पाल्याच्या क्लासेससाठी दरवर्षी २० हजार कुटुंबे करतात स्थलांतर : कोचिंग क्लाससाठी बाहेरगावाहून लातुरात येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. ५ लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहरात दरवर्षी २० हजारांहून अधिक कुटुंबे स्थलांतरित होतात. कोचिंग संपल्यावर ती आपल्या गावी परततात. डाॅक्टर, आयआयटीला जाण्याचे स्वप्न असलेले हजारो विद्यार्थी राज्यभरातून येथे दाखल होतात. यामध्ये मराठवाड्यातील व शेजारील जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेक विद्यार्थी वसतिगृहावर राहतात, तर काही इतर विद्यार्थ्यांसोबत रूम करून किंवा पालकांसोबत लातूरला मुक्काम करतात.

बॅचचाही ‘क्लास’ : फीसनुसार नॉर्मल ते गोल्डनपर्यंत श्रेणी
इथल्या मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये प्रत्येकी २ हजार ते १५ हजार विद्यार्थी आहेत. मोठ्या हॉलमध्ये चालणारे त्यांचे वर्ग आणि एकेका क्लासेसची बहुमजली इमारत. १ हजार विद्यार्थ्यांची इथे नियमित बॅच चालते. २०० ते ३०० विद्यार्थ्यांच्या स्पेशल बॅच तर फक्त ५० ते १०० विद्यार्थ्यांची गोल्डन बॅच. अर्थात, बॅचचा ‘क्लास’, विद्यार्थी संख्या कमी होते तशी फी वाढत जाते.

कोटाच्या बरोबरीने वेग
राजस्थानातील कोटा येथे १९८७-८८ च्या दरम्यान कोचिंग व्यवसाय सुरू झाला. वार्षिक २ लाख विद्यार्थ्यांचा आकडा गाठण्यासाठी ३५ वर्षे लागली. लातुरात १० वर्षांपूर्वी कोचिंग व्यवसाय सुरू असला तरी गेल्या ५ वर्षांतच तो नावरूपास आला आहे. वार्षिक ५० हजार विद्यार्थ्यांचा आकडा १० वर्षांतच गाठला.

प्राध्यापकांची पळवापळवी
शाहू कॉलेजच्या प्राध्यापकांना मोठी मागणी आहे. आता नव्याने येणारे प्राध्यापक दक्षिण भारतातील असून त्यांचे वार्षिक पॅकेज ८० लाख ते १ कोटीच्या घरात आहे. प्राध्यापकांच्या या मार्केटमध्येही तीव्र स्पर्धा असून कोचिंग क्लासचालकांकडून या प्राध्यापकांची पळवापळवीही हाेते.

बातम्या आणखी आहेत...