आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसक्या आवळल्या:बियाणी हत्या प्रकरणात 7 व्या आरोपीला पंजाबमधून अटक,  पोलिसांच्या रडारवर दहशतवादी रिंदाचे साथीदार

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणातील सातव्या आरोपीच्या स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पी.डी.भारती यांच्या पथकाने बुधवारी पंजाबमधील पतियाळा येथून मुसक्या आवळल्या. पकडलेला आरोपी नांदेडमधील रहिवासी आहे. याआधी सहा आरोपींना अटक झाली असून हे सर्वजण दहशतवादी रिंदाचे हस्तक आहेत. रिंदाचे साथीदार पोलिसांच्या रडारवर आहेत.

बिल्डर संजय बियाणी यांची ५ एप्रिल २०२२ रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून त्यांच्या शारदानगर येथील घरासमोर हत्या केली होती. विमानतळ पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह इतरही गुन्हे दाखल झाले होते. याचा तपास एसआयटी करत आहे. या गुन्ह्यात हरदीपसिंघ ऊर्फ हार्डी सपुरे (रा. यात्री निवास रोड, नांदेड) याचा सहभाग असल्याची व तो पंजाबमध्ये पळून गेल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पी.डी.भारती व पथक तयार करून पंजाबकडे रवाना करण्यात आले. या पथकाने पंजाबमधील पतियाळा येथील सीआय स्टाफचे पोलिस निरीक्षक शमिंदरसिंघ धनोह व त्यांचा स्टाफ यांच्या मदतीने हरदहीसिंघ ऊर्फ हार्डी बबनसिंग सपुरे (२८) यास पतियाळा येथून ताब्यात घेत एसआयटीसमोर हजर केले. तपासामध्ये या आरोपींचा गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने १ जून रोजी अटक करण्यात आली. या आरोपीस आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले.

कोम्बिंग ऑपरेशनमधून मिळाला आरोपीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ५ एप्रिल ते ३ मेदरम्यान, शहर व जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली होती. यातील आरोपींना दररोज पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरीसाठी बोलावण्यात येत होते. यातील सहा आरोपींवर पोलिसांची नजर होती. त्यांच्या बोलणे व हावभावावरून हा संशय अधिकच बळावला. आरोपीविरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटक झालेल्या सहा आरोपींपैकी एकास पुणे येथून तर उर्वरित पाच जणांना नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी मारेकऱ्यांना मदत केली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

गाेळीबार करणाऱ्यांना शाेधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर ५५ दिवसांपूर्वी शारदा नगर परिसरातील त्यांच्या घरासमोर गाेळ्या झाडून हत्या झाली होती. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह नांदेड शहर व इतर सहा राज्यांमध्ये तपास केला. त्यानंतर १ जून रोजी ६ आरोपींना अटक झाली. परंतु, गोळीबार करणारे आरोपी मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचा शाेध घेण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आठवडाभरातच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्‍वास नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...