आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेडमध्ये भरदिवसा एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसाय़िकावर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या काळ्या कपड्यातील दोन हल्लेखारांनी बांधकाम व्यावसायिकावर धाड्-धाड् गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाला. आज सकाळी 11 वाजता ही घटना घडली असून हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संजय बियाणी असे गोळीबार झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. अगदी 30 सेकंदात हा खूनाचा प्रकार घडला.
बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी मंगळवारी सकाळी 11 वाजता आपल्या गाडीतून शारदा नगर येथील घरासमोर आले. घरासमोर गाडी उभी करून खाली उतरले. यानंतर लगेचच काळ्या रंगाचे कपडे घालून एकाच दुचाकीवरून दोन मारेकरी आले. त्यांनी बियाणी यांच्या चारचाकीसमोर दुचाकी उभी केली. दुचाकीवरून खाली उतरत दोघे लगेचच बियाणी यांच्या दिशेने पळत आले. त्यांनी आपल्या हातातील पिस्तुल बियाणींवर रोखत गोळ्या झाडल्या. यात संजय बियाणी रस्त्यावर खाली पडले. बियाणी खाली पडताच मारेकरी पुन्हा आपल्या दुचाकी गाडीकडे पळाले.
चालकावरही झाडल्या गोळ्या
हल्ल्यानंतर मारेकऱ्यांपैकी एकाने जाता जाता बियाणी यांच्या चार चाकीचे चालक रवी यांच्यावर गोळीबार केला. ते सुध्दा या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गोळीबार होताच संजय बियाणी आणि त्यांच्या ड्रायव्हर रवी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटना सीसीटीव्हीत कैद
हल्लेखोर दुचाकीवरून बियाणी यांच्या गाडीसमोर आले. बियाणी यांनी ड्रायव्हर साईजने कारचा दरवाजा उघडून गाडीच्या मागच्या बाजूने येत असताना विरूद्ध बाजूने त्यांच्यासमोर दोघेही मारेकरी पळत आले व त्यांनी धाड्-धाड् गोळ्या झाडल्या. हा प्रकार लगतच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू
गोळीबाराचा आवाज होताच लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजय बियाणी यांच्या दिशेने धावले. तोपर्यंत हल्लेखार पसार झाले होते. दरम्यान बियाणी यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. तत्पुर्वी घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून त्याद्वारे मारेकऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे. अचानक झालेल्या गोळीबारानंतर सध्या शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इनपुट -शरद काटकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.