आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऑटोरिक्षाचे हँडल आता महिलांच्या सुरक्षित हाती, सक्षमीकरण अन् सुरक्षेसाठी नांदेड-वाघाळा मनपाकडून मिळणार मोफत प्रशिक्षण

नांदेड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड शहरात महिला सक्षमीकरण, सुरक्षा व गरजूंना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महिलांना अ‍ॉटोरिक्षा चालवण्याचे मोफत प्रशिक्षण महापालिकेच्या वतीने दिले जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या शिक्षण, महिला बालकल्याण समितीमार्फत २० मेपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.

नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षांची संख्या आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अ‍ॉटोरिक्षा हे उपजीविकेचे चांगले साधन ठरत आहे. यात पुरुषांची संख्या अधिक आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्याचे चित्र आहे. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरात अ‍ॉटोरिक्षा, टॅक्सी चालवताना महिला दिसतील. परंतु, मराठवाड्यात अ‍ॉटोरिक्षा चालवणाऱ्या महिलांचे दुर्मिळ चित्र आहे. शहरातील अ‍ॉटोरिक्षातून अनेक महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, मोबाइल लांबवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता महिला अ‍ॉटोरिक्षा चालक असेल तर महिला प्रवाशांना आरामदायक व सुरक्षित प्रवास करता येईल. दरम्यान, नांदेड-वाघाळा महापालिकेतील स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून महिलांना आत्मनिर्भर करण्यासोबतच सुरक्षेच्या अनुषंगाने गरजू महिलांना अ‍ॉटोरिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे प्रशिक्षण लांबले होते. या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार असून महिला प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. महापालिकेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना अधिक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न असेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लायसन्स मिळवून दिले जाईल, असे सभापती किशोर स्वामी यांनी सांगितले. दरम्यान, इच्छुक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, असे आवाहन केले आहे. या प्रशिक्षणासाठी किती महिलांचा प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपाच्या वतीने या वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महिलांची सुरक्षितता आणि त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगत महापौर जयश्री पावडे यांनी समितीचे कौतुक केले आहे.

अर्ज आल्यानंतर पुढील प्रक्रिया
शिक्षण, महिला व बालकल्याण समितीतर्फे गरजू महिलांना अ‍ॉटोरिक्षा प्रशिक्षण घेतले जाणार आहे. सध्या २० मेपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. यात किती महिलांना प्रशिक्षण द्यावे यासह अन्य बाबी अर्ज आल्यानंतर पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल. हे प्रशिक्षण मोफत असेल, असे शिक्षण महिला बालकल्याण समितीच्या सभापती अर्पणा नेरलकर यांनी सांगितलेे.
गरजू महिलांकडून मागवले २० मेपर्यंत अर्ज

बातम्या आणखी आहेत...