आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासासरहून लेकीला माहेरी आणण्यासाठी गेलेल्या बापासह लेकीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर (उदगीर-जांब रोडवर) पाटोदा (खु.) फाटयाजवळ घडली. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. बालाजी किशनराव रासवते (४०, रा. सोमासवाडी, ता.कंधार) व राजश्री राजेश श्रीमंगले अशी मृतांची नावे आहेत.
कंधार तालुक्यातील फुलवळअंतर्गत असलेल्या सोमासवाडी येथील बालाजी किशनराव रासवते हे २ जानेवारी रोजी सायंकाळी मुलगी राजश्रीला आणण्यासाठी उदगीरला गेले. रात्रीच्या वेळी मुलीला घेऊन परत येत असताना रात्री उशिरा पाटोदा खुर्द पाटीच्या शेजारी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वळणाच्या ठिकाणी दुचाकी रस्त्याच्या कडेला कोसळली. दोघेही बाप-लेकीच्या डोक्याला व शरीरावर इतर ठिकाणी जबरदस्त मार लागला. रात्री उशिरा हा अपघात झाल्याने असल्याने मदतीला कुणीही पोहचू शकले नाही. त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, मंगळवारी (३ जानेवारी) पहाटे पाटोदा येथील युवक व्यायाम करण्यासाठी या रस्त्यावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या शेजारी दरीत एक दुचाकी तसेच एक पुरुष व एक महिला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जळकोट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मूळ गाव सोमासवाडी येथे मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सायंकाळी उदगीरला पोहोचले, रात्री करत होते परतीचा प्रवास
मृत राजश्री या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. बाळंतपणासाठी त्यांना माहेरी सोमासवाडी येथे आणण्यासाठी वडील बालाजी किशनराव रासवते हे उदगीरला गेले होते. अपघातात राजश्री यांच्यासह गर्भातील बाळाचाही करुण अंत झाला. राजश्री यांच्या पश्चात पती राजेश श्रीमंगले व त्यांचे कुटुंबीय असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.