आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतराचा परिणाम:विकासाला गती की लागेल ब्रेक! नांदेडला अडीच वर्षांत खेचून आणली होती अनेक कामे

शरद काटकर | नांदेड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतर झाले व ठिकठिकाणची राजकीय गणिते बदलली. मागील अडीच वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात विकासकामांनी पकडलेली गती कायम राहील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माजी मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री असलेल्या अशोकराव चव्हाणांनी राजकीय वजन वापरून अनेक कामे खेचून आणली. पण आता सरकार कोसळल्याने जिल्ह्यातील ती कामे पूर्ण होणार की प्रस्थापितांचे राजकीय खच्चीकरण करताना विकास रखडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, गेल्या अडीच वर्षांत नांदेड जिल्ह्यात विकासाने गती पकडली होती. नांदेड शहरात अशोकराव चव्हाण यांनी अनेक उड्डाणपुलांसाठी मंजुरी आणली होती. केंद्रीय महामार्ग, राज्य महामार्ग याला मंजुरी देऊन नांदेड शहराला हे मार्ग जोडण्यासाठी प्रयत्न केले. बांधकाम खाते त्यांच्याकडे असल्याने शहरातील विविध रस्त्यांना निधी उपलब्ध करून हे रस्ते चौपदरी करण्याचे काम सुरू झाले होते. तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध जिल्हा मार्ग, महामार्ग, राज्य मार्गांच्या रस्त्यांना निधी उपलब्ध केला गेला. राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी विविध योजनांसाठी दिला. नवीन सरकार आल्याने जिल्ह्याला एखाद-दुसरे मंत्रिपद मिळाले तरी दीर्घ राजकीय अनुभवाचा अभाव असल्याने त्याचा वापर किती होतो हा मोठा प्रश्न असल्याचे राजकीय जाणकार म्हणतात.

चव्हाणांचे राजकीय खच्चीकरण शक्य
^माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते आहेत. भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नांदेडमध्ये पक्षसंघटनेला बळकटी द्यायची असेल तर अशोकरावांचे राजकीय खच्चीकरण करणे अनिवार्य आहे. कारण ते मुख्यमंत्री व मंत्री असताना या जिल्ह्यासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या आहेत. त्या आता अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा निधीबाबत भविष्यात अडचण होण्याची शक्यता आहे. सढळ हाताने नांदेडला निधी मिळत होता. आता त्यामुळे विकासावर परिणाम होईल.
- विनायक एकबोटे, राजकीय विश्लेषक, नांदेड.

राजकीय बलाबल
विधानसभा मतदारसंघ 09
खासदार भाजप 01
भाजपचे आमदार 03
भाजप वि. प. आमदार 01
काँग्रेसचे आमदार 04
वि. प. आमदार काँग्रेस 01
शिवसेना आमदार 01
शेकाप आमदार 01

ही विकासकामे लांबणीवर पडणार
- जालना-नांदेड समृद्धी मार्ग, मुंबई-जालना-हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
- गोदावरीचे ६४ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावे हा निर्णय घेतला होता
- ४० नवीन प्रकल्प, ७ पैनगंगेवरील प्रकल्प, नांदेड येथील लेंडी प्रकल्प पुनर्वसन प्रश्न
- जिल्हा न्यायालयाच्या इमारती, जिल्हा शासकीय संकुल
- ३०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, नांदेड ते बासर मार्ग अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प
- विभागीय महसूल आयुक्तालय, नांदेड पोलिस आयुक्तालय
- नांदेड शहरात सध्या सुरू असलेली १५० कोटींची रस्त्यांची कामे रखडू शकतात.

बातम्या आणखी आहेत...