आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये नरबळीचा संशय:तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; मृतदेहाशेजारी आढळले लिंबू, फुले, तांब्या

नांदेड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांडुरंग तोटेवाड या (वय 32) तरुणाचा मृतदेह तेलंगणा सीमेवर असलेल्या वाशी येथील जंगलच्या भागात आढळून आला आहे.

नांदेडमध्ये वाशी येथील जंगलात एका तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे समोर येत आहे.

मृतदेहाशेजारी लिंब, तांब्या आणि फुले आढळून आले आहेत. त्यामुळे हा प्रकार नरबळीचा असल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच, आसपास राहणाऱ्या नागरिकांनीही हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

4 आरोपींवर गुन्हा

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात राहणाऱ्या पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड या (वय 32) तरुणाचा मृतदेह तेलंगणा सीमेवर असलेल्या वाशी येथील जंगलच्या भागात आढळून आला. त्याचा चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत होता. त्यामुळे त्याचा निर्घृण खून असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी एक महिला व तीन पुरुष अशा चार आरोपींवर कलम 302, 34 भादंवि नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अपघात भासवण्याचा प्रयत्न

मृत तरुण लक्ष्मण तोटेवाड हा लाकडोबा चौक येथील रहिवासी आहे. पोलिसांना त्याचा मृतदेह वाशीच्या जंगलात 8 सप्टेंबर रोजी तीन वाजेच्या सुमारास आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा आपल्या घराशेजारी बसलेला असताना आरोपींनी त्याला बोलावून सोबत नेले. त्यास वाशीच्या जंगल भागात नेऊन अन्य साथीदाराच्या मदतीने दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेला वाचा फुटू नये म्हणून हा अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे नातेवाईकांनी सांगितले आहे.

व्हिडीओ कुणी काढला?

दरम्यान, मयत तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुणी काढला, तो कसा व्हायरल झाला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच, मृतदेहाशेजारी लिंब, तांब्या आणि फुले आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा व आरोप नातेवाइकांसह घटनास्थळावर गेलेल्या नागरिकांतून केला जात आहे.

जुन्या वादातून खून?

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून खुनाच्या घटनेचा कसून तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत बालाजी तोटेवाड यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून खून केला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांनी संगनमत करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.

आरोपींनीच रीक्षातून तरुणाला नेले

मृत तरुणाच्या भावाने याबाबत सांगितले की, आरोपींनी गुरुवारी बाहेर जायचे सांगून भावाला आपल्यासोबत रीक्षात नेले. त्यानंतर दोन तासांनी मला आरोपींनी फोन केला व आमचा अपघात झाल्याचे सांगितले. मी घटनास्थळी गेलो तेव्हा अपघातासारखे चित्र दिसले नाही. भावाच्या मृतदेहाशेजारी लिंबू, तांब्या, फुले अशा वस्तू सापडल्या. त्यामुळे त्याचा नरबळीतून खून झाल्याचा संशय आम्हाला आहे.

बातम्या आणखी आहेत...