आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत:नांदेडचे व्यापारी गुंडांच्या टार्गेटवर, व्यापाऱ्यांवर गोळीबाराच्या घटना वाढल्या, बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज मोंढा मार्केट बंद

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोन वर्षे आधी त्यांना पाच कोटींची खंडणी मागण्यात आली होती. गाेळीबार झाल्याची ही पहिलीच घटना नसून याआधीही शहरात व्यापाऱ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. आजच्या घटनेनंतर खंडणीसाठी व्यापारी, व्यावसायिक टार्गेटवर असल्याचे दिसते.

या दोन वर्षांत व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस कार्यकर्ते तथा व्यापारी गोविंद कोकुलवार यांच्यावरही गोळीबार झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने ते सुखरूप आहेत. याशिवाय तांडा बारचे मालक राठोड यांनाही खंडणी मागण्यात आली. हिंगोली गेट पुलाजवळ त्यांच्यावर बंदुकीने हल्ला करण्यात आला होता. जुना मोंढा भागात गोळीबार करून व्यापाऱ्यांना लुटण्यात आले. बंदुकीचा धाक दाखवून अनेक व्यापाऱ्यांना लुटून लाखो रुपये लंपास केले आहेत. दुसरीकडे पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी (६ एप्रिल) नवा मोंढा व्यापारी असोसिएशनच्या वतीने नवा मोंढा मार्केट बंदचा निर्णय घेण्यात आला.

सामाजिक संवेदना जपणारा व्यावसायिक गमावला
संजय बियाणींच्या रूपात नांदेडने एक सामाजिक संवेदना जपणारा तरुण, होतकरू व्यावसायिक गमावल्याची शोकसंवेदना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. शहराच्या सर्वच भागात निवासी व व्यावसायिक संकुले उभी करून त्यांनी अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले व अनेक बेरोजगारांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले. तर, बियाणी यांची निर्घृण हत्या म्हणजे बिहारलाही लाजवेल अशी घटना असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.

संजय बियाणी यांनी ग्राहकांना परवडणाऱ्या दरात दिली घरे
राज डेव्हलपर्स या फर्मच्या माध्यमातून नांदेड शहरातील बांधकाम व्यवसायात संजय बियाणी यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. राज्यातील इतर मोठ्या शहरातील जे नवे, ते नांदेड शहरात देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात घरे त्यांनी उपलब्ध करून दिली. बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास १५ हजारांवर लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच त्यांच्या आई स्व.कांताबाई बियाणी पार्कची निर्मिती करून माहेश्वरी समाजातील तब्बल ७३ गरजूंना हक्काचे घर उपलब्ध करून दिले. या घटनेला आठ दिवसांचा अवधी उलटला आहे.

नांदेड : गोळीबाराच्या घटनेनंतर रुग्णालयासमोर संजय बियाणी यांचे शोकमग्न नातेवाईक.
नांदेड : गोळीबाराच्या घटनेनंतर रुग्णालयासमोर संजय बियाणी यांचे शोकमग्न नातेवाईक.

व्यापाऱ्यांना लक्ष्य केलेल्या घटना
डॉक्टर्स लेन परिसरात २४ डिसेंबर २०२१ रोजी भुसार व्यापारी राजकुमार मुंदडा यांचे ६ लाख ५० हजार रुपये लांबवण्यात आले. यातील आरोपींना अटक झाली आहे. तसेच डिसेंबर २०२१ मध्ये मोंढ्यातील हळद व्यापारी जुगलकिशोर बाहेती यांचा पाठलाग करून दुचाकीवरील दोघांनी कपाटातील दोन लाख रुपये लांबवले होते. भोकर येथील एका व्यापाऱ्याची नांदेडमधील बाफना टी पॉइंटवर डिसेंबर २०२१ मध्ये ५० लाखांची बॅग पळवण्यात आली होती. यातील आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान, बियाणी यांच्या हत्येनंतर जिल्ह्यात नाकेबंदीचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, हल्लेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हद्दीतील पोलिसांची मदतही घेतली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...