आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड शहरातील ३६ निराधारांची कटिंग, दाढी करून त्यांना स्नान घालण्यात आले. त्यांना रेनकोट व नवीन कपडे देऊन त्यांचा कायापालट करण्यात आला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी “कायापालट’ हा उपक्रम मागील १८ महिन्यांपासून राबवण्यात येतो.
भाजप महानगर नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने ॲड. दिलीप ठाकूर हे कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबवतात. निराधार व सतत भटकंती करत अस्वच्छ अवस्थेत असलेल्यांची कटिंग, दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे व प्रत्येकी शंभर रुपयांची बक्षिसी देण्यात येते. लायन्स विभाग अध्यक्ष संजय अग्रवाल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णाचे अध्यक्ष अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, मंगेश पोफळे, सुरेश निलावार, संजयकुमार गायकवाड यांनी शहरातून फिरून वेगवेगळ्या ठिकाणाहून निराधारांना दुचाकीवर बालाजी मंदिर परिसरात आणले. स्वयंसेवक बजरंग वाघमारे यांनी सर्वांची कटिंग, दाढी केली. स्नानासाठी व्यवस्था बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली होती. कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या निराधार व्यक्तींना साबण देऊन स्नान करायला लावले. स्वच्छ होऊन नवीन कपडे घातल्यामुळे त्यांचा जणू कायापालटच झाला. या उपक्रमाला लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. असहाय असणारे कचरा वेचणारे, वेडसर अपंग व्यक्तीबद्दल कळवण्याचे आवाहन ॲड. ठाकूर यांनी केले.
अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद
पावसाळा असल्यामुळे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोटचे वाटप करण्यात आले. अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच रेनकोट घातल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्वांच्या चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली. चार तास सुरू असलेल्या कार्यक्रमानंतर बालाजी मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.