आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त केली.'' असा घणाघाती हल्ला खासदार राहुल गांधी यांनी आज केला.
भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या दिवशीची पदयात्रेची सांगता भोपाळा गाव येथील छोटेखानी सभेने झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.
लाखो लोक बेरोजगार
राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे, मध्यम, लघु उद्योगाचे मोठे नुकसान झाले, लाखोंच्या संख्येने उद्योग बंद पडले, लाखो रोजगार गेले. तर नोटबंदीच्या लहरी निर्णयानेही नुकसान झाले. दोन्ही निर्णयाने देशाचे मोठे नुकसान व केवळ दोन-तीन उद्योगपतींचा फायदा झाला.
उद्योगपतींचे लाखो रुपये माफ
राहुल गांधी म्हणाले, शेतक-यांचे कर्ज माफ होत नाही पण मोठ्या उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज मात्र माफ होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भांडवलदारांना विकले जात आहेत परिणामी तरुणांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे.
भाजप, आरएसएस द्वेष पसरवतेय
राहुल गांधी म्हणाले, देशात द्वेष पसरवण्याचे काम भाजप, आरएसएस कडून केले जात आहे. जाती-धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. आपल्याच देशातील जाती- धर्मांच्या लोकांमध्ये भांडणे लावणारे भाजपवाले कोणत्या देशाचे राष्ट्रभक्त ? असा सवाल विचारात हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.
कृष्णकुमार पांडेंना श्रद्धांजली अर्पण
भारत जोडो यात्रेदरम्यान आज सकाळी मृत्यू पावलेल्या काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांना या सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पांडेंच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत
भारत जोडो यात्रेदरम्यान मृत्यू पावलेले काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे 25 लाखांची मदत करण्यात येणार आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.