आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना उद्धव ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केल्याने मराठवाड्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभेत वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. पण आता झालेली युती मुंबई पालिका निवडणुकीनंतरही लोकसभा, विधानसभेसाठी कायम राहिली तर उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यात डॅमेज कंट्रोल करण्यासह मोठे पाठबळ मिळू शकते आणि वंचित बहुजन आघाडीलाही अधिक ताकद वाढवण्यासह काही उमेदवार निवडून आणण्याची संधी निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात शिवसेनेची चांगली ताकद हाेती. माेठा फटकाही याच विभागात बसला. आैरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार शिंदे गटात सामील झाले. नांदेड व उस्मानाबादच्या आमदारांनी ठाकरेंची साथ साेडली. आता या विभागात डॅमेज कंट्राेल करण्यासाठी ठाकरेंना “वंचित’च्या निमित्ताने तगडा साथीदार मिळाला आहे. आैरंगाबाद जिल्ह्यात लाेकसभेला एमआयएम व “वंचित’च्या युतीनंतर आंबेडकरी समाजाने एकगठ्ठा मते इम्तियाज जलील यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे ते खासदार म्हणून निवडून आले. आता शिवसेनेशी युती झाल्याने आैरंगाबाद महापालिकेत हीच मते शिवसेनेला मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त हाेत आहे.
नांदेड लोकसभा आणि विधानसभा क्षेत्रात ‘वंचित’चा दबदबा
नांदेड : ‘वंचित’मुळे अशाेकराव चव्हाण लोकसभा हरले
२०१९ मध्ये लोकसभेत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना ४ लाख ८६ हजार ८०६, काँग्रेसचे अशोकराव चव्हाण ४ लाख ४६ हजार ६५८ तर वंचित बहुजन आघाडीचे प्रा.यशपाल भिंगे यांना एक लाख ६६ हजार १९६ मते पडली. तर विधानसभेत उत्तरमध्ये शिवसेनेकडून आमदार बालाजी कल्याणकर यांनी ६२ हजार ८८४ मते घेतली. आता ते शिंदे गटात गेल्याने राजकीय चित्र वेगळे असेल.
परभणी : लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या गटाला फायदा
परभणी : जिल्ह्यात युतीचा फायदा शिवसेनेच्या ठाकरे गटास होणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत संजय जाधव हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तर वंचित बहुजन आघाडीच्या आलमगीर खान अखिल मोहम्मद खान यांनी तब्बल दीड लाख मते मिळवली होती.
हिंगोली : लोकसभेसह विधानसभा मतदारसंघात निर्णायक
हिंगोली : मागील लोकसभेत हिंगोली मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने १.७४ लाख मते घेतली. तर कळमनुरीत वंचितचा उमेदवार तब्बल ६६,१३७ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होता. हिंगोली विधानसभेत वंचितला १९,८५६ तर वसमत विधानसभेत २५,३९७ मते मिळाली. ही सर्व मते आता शिवसेनेच्या उमेदवाराकडे वळल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.
मराठवाड्यात वेगळे लढले तर फारसा परिणाम नाही
^मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती झाल्याचे दिसते. मराठवाड्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना एकत्र लढले आणि त्यांच्यासोबत अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले तर त्याचा परिणाम अधिक दिसून येईल. अन्यथा काहीही परिणाम होणार नाही. मराठवाड्यात मुस्लिम मतदारांसह मागस जाती, जमातींमधील मतदारही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मागील लोकसभा, विधानसभेत वंचित व एमआयएमच्या युतीचा फटका महाविकास आघाडीला बसला. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी युती केली. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, वंचित बहुजन आघाडी हे सर्वजण एकत्र लढल्यास भाजपसमोर मोठे आव्हान असेल.'
- विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.