आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील बहुचर्चित कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आराेपी तथा तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर याने पाेलिस व तपास यंत्रणांना तब्बल साडेतीन वर्षे हुलकावणी दिल्यानंतर अखेर शुक्रवारी (ता.१७) नांदेड जिल्ह्यातील नायगाव न्यायालयात शरणागती पत्करली. त्याला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सीआयडीने त्यास ताब्यात घेतले आहे. वेणीकरच्या शरणागतीमुळे कृष्णूर धान्य घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे.
प्रारंभी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला, परंतु प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे दिला. हसन यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे जमा करून १९ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. इंडिया मेगा कंपनीचा मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया, वाहतूक कंत्राटदार पारसेवार, हिंगोलीचा कंत्राटदार ललित खुराणा यांना अटक झाली. या प्रकरणाची व्याप्ती नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांपर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास नंतर सीआयडीकडे देण्यात आला. या प्रकरणातील सर्व प्रमुख आरोपींना जामीन नाकारल्यानंतर त्यांची जवळपास एक वर्ष तुरुंगात रवानगी करण्यात आली. कोरोनाच्या लाटेत हे सर्व जण जामिनावर सुटले.
काय होते प्रकरण? : संतोष वेणीकर नांदेडचा जिल्हा पुरवठा अधिकारी असताना १८ जुलै २०१८ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा आणि सहायक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी कृष्णूर (ता. नायगाव) येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे १९ ट्रक पकडले. कृष्णूर येथील इंडिया अँग्रो मेगा अनाज कंपनीसमोर हे सर्व ट्रक पकडण्यात आले. या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारा गहू, तांदूळ आदी धान्य होते.
कारवाईच्या भीतीने वेणीकर साडेतीन वर्षे भूमिगत
कृष्णूर घोटाळ्यात कारवाई होईल या भीतीने तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर भूमिगत झाला. त्याने बिलोली व औरंगाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्जही केले. तथापि न्यायालयाने जामीन नाकारला. दरम्यानच्या काळात शासनाने त्याची नांदेडहून परभणी येथे बदली केली. परंतु बदलीनंतरही त्याच्यामागचा ससेमिरा सुटला नाही. न्यायालयाने वारंवार जामीन नाकारल्यानंतर संतोष वेणीकरने तब्बल साडेतीन वर्षांनंतर न्यायालयात शरणागती पत्करली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.