आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वदूर संततधार:नांदेडमध्ये दमदार पाऊस अन् परभणीत रिपरिप, जालन्यात वीज पडून एक ठार; खामगावात 3 तास मुसळधार

नांदेड/जालना/परभणी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चार दिवसांपासून चांगलाच जोर पकडला आहे. नांदेड जिल्ह्यात तर शनिवारी रात्रीपासून पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील मसई तांडा येथे वीज पडून २६ वर्षीय युवकाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. तर परभणीतही संततधार सुरू असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. जवळपास २० दिवस पाऊस झाला नाही. परिणामी पिकांनी माना टाकल्या होत्या. दरम्यान, मागील चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील नांदेडसह माहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर येथे जोरदार पाऊस झाला. ओढे, नाले ओसंडून वाहत होते. माहूर येथील हरडफ या गावात अतिवृष्टी झाली.

जालन्यात मका, कपाशी, ऊस पिके जमीनदोस्त; वीज पडून जनावरेही दगावली

जालना | अंबड तालुक्यात मसई तांडा येथे वीज पडून २६ वर्षीय युवकाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. श्रीराम अर्जुन जाधव असे मृताचे नाव आहे. रामसनपूर येथील सतीश दत्तू तळेकर यांची गाय व म्हैस दगावली. शनिवारी रात्री भोकरदन तालुक्यात बामखेडा येथील ज्ञानेश्वर काळे यांचा बैलही दगावला होता. शनिवारी व रविवारी वीजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे मका, कपाशी, ऊस आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत.

परभणीसह जिंतूर, पूर्णा, मानवत तालुक्यात दमदार पुनरागमन; पिकांना जीवदान

परभणी | जिल्ह्यात २० ते २५ दिवसांच्या खंडानंतर परभणी, जिंतूर, पूर्णा, मानवत तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केले. यामुळे माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. रविवारी दुपारपर्यंतही चांगला पाऊस झाला. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे ओढे-नाल्यांना पाणी आले होते. पूर्णा तालुक्यातील कावलगाव, धानोरा मोत्या, ताडकळस, पूर्णा शहर, चुडावा परिसर अशा अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. परभणी तालुक्यात १८.४ मिमी, गंगाखेड निरंक, पाथरी ७.२ मिमी जिंतूर ०.६ मिमी, पूर्णा ३.० मिमी पावसाची नोंद झाली.

खामगावात मुसळधार पावसाने हाहाकार

खामगाव| औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि करमाड परिसरालाही पावसाने झोडपून काढले. फुलंब्री तालुक्यातील खामगाव परिसरात ११ सप्टेंबर रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. खामगाव येथे शेतामध्ये व गावांमध्ये सर्वत्र नदी स्वरूप निर्माण झाले होते. अनेक दुकानांसह घरामध्ये पाणी शिरले होते. यामुळे पिकांसह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

खामगावात सतत ३ तास पडलेला पावसामुळे वडोदबाजारातून वाहणारी गिरिजा नदी दुथडी भरून वाहिली. शेतामधून नदी स्वरूपातून पाणी वाहत असल्याने मक्का कपाशी पिके आडवी पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खामगाव परिसरात शेतकऱ्यांच्या काही दुचाकी बांधावर उभ्या होत्या. त्या या पावसामुळे वाहून गेल्या.

बातम्या आणखी आहेत...