आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड जिल्ह्यात धो-धो पाऊस:हिमायतनगरसह अनेक गावांना पुराचा वेढा, मार्ग बंद; विष्णुपुरी धरणातून विसर्ग सुरू

नांदेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून जोर वाढवत हिमायतनगर, किनवट, धर्माबाद तालुक्याला चांगलेच धुतले आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून रस्ते, नगर जलमय झाल्याचे चित्र आहे. पुलावरून पाणी गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्पाचे सकाळी ११.३० वाजता दोन गेट उघडून ६९२ क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. या पावसामुळे शिल्लक पिकेही धोक्यात आली आहेत. हिमायत नगरला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ७ तास ठप्प झाली होती.

किनवटमधील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. छोट्या-मोठ्या नदीला पूर आला आहे. इस्लापूर, जलधारा, शिवणी, आप्पारावपेठ या भागात जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. कोसमेट, इस्लापूर, कुपटी, नांदगाव, अप्पाराव पेठ, शिवणी, गोंडजेवली, मलकजामतांडा, मलकजाम, अमलापूर आदी गावांचा संपर्क तुटला आहे. इस्लापूर ते किनवट रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. रेल्वे पुलाखाली पाणी खूप आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक तब्बल सात तास ठप्प झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्र यासह अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने मार्ग बंद झाले आहेत.

रुग्णवाहिका अडकली : हिमायतनगर शहरातील मुख्य कमानीजवळ आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने ६ तास वाहतूक ठप्प झाली होती. राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने इस्लपूर भागातील हुंडी येथील एका रुग्णाला प्रसूतीसाठी नांदेडला जायचे होते. मात्र पुरामुळे रस्ता बंद पडल्याने रुग्णवाहिका हिमायतनगर शहराजवळ तासभर अडकून पडली. पूर ओसरत नसल्याचे दिसल्याने लांब पल्ल्याच्या मार्गाने रुग्णवाहिकेला काढून देण्यात आले आहे. याशिवाय धर्माबाद बाभळी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. इतर तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे.

२४ तासांत सरासरी १९.२० मि.मी. पाऊस : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.२० वाजता संपलेल्या गत २४ तासांत सरासरी १९.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण ७०८.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाऊस मिलिमीटरमध्ये तालुकानिहाय

पुढीलप्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- १ (६५८.६०) बिलोली-३०.६० (७६२), मुखेड- २२.४० (६६०.६०), कंधार-२०.७० (६८२.३०), लोहा-८.१० (६३५.७०), हदगाव-६.२० (६३४.८०), भोकर-११.७० (८०४), देगलूर-१५.३० (६१९.९०), किनवट-४२.३० (७७३.४०), मुदखेड- १.९० (८५२.८०), हिमायतनगर-२५ (९२९.१०), माहूर- ३७.३० (६४६.४०), धर्माबाद-४८.७० (७९४.१०), उमरी- १७.८० (८६७.१०), अर्धापूर- ००.५० (६४५.४०), नायगाव- १४.५० (६४८.२०) मिलिमीटर आहे.

वडगावची जिल्हा परिषद शाळा पाण्यात : हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पाणीच पाणी झाले आहे. मंगळवारच्या पावसाने गावात पाणी घुसण्याची शक्यता आहे.

नांदेड : हिमायतनगर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले असून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र यासह

बातम्या आणखी आहेत...