आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतीवर काढलेल्या कर्जाच्या वादातून पत्नीला बेदम मारहाण करत रॉकेल टाकून जिवंत जाळून ठार मारणाऱ्या पतीला येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी सोमवारी (१३ जून) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात मृत महिलेच्या सात वर्षे वयाच्या मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली.
कंधार तालुक्यातील पांगरा (तळ्याचा) येथील संदीप माणिकराव सूर्यवंशी (३५) हा आपली पत्नी यशोदा (३०) व एक मुलगा, एक मुलीसह भाड्याने राहत होता. संदीपने शेतीवर ५० हजार रुपये कर्ज काढले होते. परंतु, त्या कर्जाच्या पैशाचे काय केले, असा जाब यशोदा या नेहमी विचारत होत्या. यातून या दोघांचा वाद होत होता. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी मुलगी शाळेत गेल्याने मुलगा घरी होता. संदीपने त्याला पाच रुपये देऊन खाऊ आणण्यासाठी दुकानावर पाठवले. यानंतर त्याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.
२२ नोव्हेंबरला रात्री उपचारादरम्यान यशोदा यांचा विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी संदीप सूर्यवंशी याला अटक केली. न्यायालयाने या प्रकरणात १२ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अहवाल तसेच जिल्हा सरकारी वकील आशिष गोधमगावकर यांनी केलेला युक्तिवाद यावरून संदीपला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची
संदीपने पत्नी यशोदाला पेटवून दिल्यानंतर ७० टक्के भाजल्या गेल्या. आईच्या ओरडण्याचा आवाज येताच दुकानावर गेलेला मुलगा धावत घरी आला होता. त्याने सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला. आईला वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यात त्याचे हात भाजले होते. त्याने न्यायालयात दिलेली साक्ष शिक्षा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.