आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापती माहेरी जाऊ देणार नाही म्हणून एका जन्मदात्रीने तिचा दोन वर्षांचा मुलगा व चार महिन्यांच्या चिमुकलीचा निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आई व भावाची मदत घेत चिमुकल्यांचे मृतदेह जाळून टाकले. माणुसकीला काळिमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यातील पांडुरणा (ता. भोकर) येथे घडली. पोलिसांनी निर्दयी मातेसह, तिचा भाऊ व आईला अटक केली. धुरपदा गणपत निलमवाड (३०) असे आरोपी आईचे नाव असून दत्ता गणपत निमवाड (४), अनुसया (चार महिने) अशी खून झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
सोमवारी रायगड येथे एका आईने आपल्या ६ मुलांना विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली होती.त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील ही घटना घडली आहे. मौजे पांडुरणा (ता.भोकर) गावातील धुरपदा ही ३१ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कुटुंबातील सर्व सदस्य झोपले असताना मुलगा दत्ता व अनुसया या दोघांना घेऊन माहेरी ब्राह्मणवाडा येथे जाण्यासाठी निघाली. तितक्यात अनुसया रडायला लागली. पतीला जाग येईल व आपल्याला माहेरी जाता येणार नाही, या भीतीने गावाजवळ एका पुलाखाली अनुसयाचा गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह पुलाखाली जमिनीत पुरून टाकला. त्यानंतर मुलगा दत्ताला घेऊन आपल्या मुदखेडजवळील माहेरी ब्राह्मणवाडा येथे सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास पोहोचल्या. यावेळी पती गणपतही तिच्या मागावर होता. त्याला पत्नी व मुलगा ब्राह्मणवाडा शिवारात गुरुद्वाराजवळ उसाच्या शेतालगत दिसली. म्हणून तो त्यांना बोलण्यासाठी त्यांच्याकडे गेला. ती मुलगा दत्ताला घेऊन पळून गेली व उसात लपली. तेथे भेदरलेला दत्ताही रडू लागला. या आवाजाने पती जवळ येऊन आपणाला घरी घेऊन जाईल, म्हणून धुरपदाने मुलाचाही गळा घोटला. पतीने शोध घेतला पण भेट झाली नाही. धुरपदा यांचा सासराही त्यांचा शोध घेत होता.
पुरलेले मृतदेह काढून लावली विल्हेवाट
धुरपदा एकटीच माहेरी पोहोचली. तेव्हा आई कोंडाबाई राजेमोड, भाऊ माधव राजेमोड यांनी मुलांबद्दल विचारले. तिने घडलेला प्रसंग सांगून मृतदेहाची जागा दाखवली. तेव्हा दत्ताचा मृतदेह घेऊन ते तिघे पांडुरणा शिवारात आले व अनुसयाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून लाकडे जमवून दोघांना जाळून टाकले. याची गुप्त माहिती मिळताच बुधवारी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. धुरपदा, तिची आई कोंडाबाई व भाऊ माधव यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. धुरपदाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.