आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊले चालती:मी तुमचा आवाज आहे अन् तुमचंच ऐकायला आलाेय, राहुल गांधींची शेतकऱ्याच्या घरी जाऊन 25 मिनिटे चर्चा

शरद काटकर | शंकरनगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉर्नर बैठकीत नोटबंदी, विमा प्रश्नासह केंद्राच्या धोरणांवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा साेमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल झाली. देगलूरमधून पुढे यात्रा निघाली अन् असंख्य लाेक या यात्रेशी जाेडले गेले. रस्त्याने चालताना शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण, लहान मुले यांच्याशी बाेलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपुलकीने सर्वांचा हात हातात घेऊन

त्यांचे एेकून घेतले. भाेपळा येथे काॅर्नर बैठक घेत केंद्राच्या नाेटबंदीच्या धाेरणावर टीका केली अन् शेतकरी, कष्टकऱ्यांना उद्देशून “मी तुमचा आहे अन् तुमचंच एेकायला आलाेय,’ असे विधान केले. वन्नाळी येथे बाबा जोरावरसिंघजी, बाबा फत्तेहसिंघजी गुरुद्वाऱ्याला राहुल गांधी यांनी भेट देत दर्शन घेतले. तसेच गुरुनानकदेवजी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पीक विमा भरूनही पैसे मिळत नाहीत; राहुल गांधी यांची कठोर टिका भाजप, संघ द्वेष पसरवतोय राहुल गांधी यांनी भोपाळा येथे कॉर्नर मीटिंग घेतली. या वेळी केंद्राच्या धाेरणावर टीका केली. तुमच्या पाठिंब्यामुळे एवढा प्रवास करूनही थकवा येत नसल्याचे म्हटले. ते म्हणाले की, मी एका शेतकऱ्याच्या घरी गेलाे. त्यांनी व्यथा मांडली त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी पैसे घेतले जातात, पण विमा मिळत नाही. अधिकारी फोन घेत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ द्वेष पसरवत असल्याचा आराेप त्यांनी केला. रात्री शंकरनगर येथे त्यांनी मुक्काम केला.

थेट शेतकऱ्याच्या घरी गेले दुपारी बिजूर फाटा येथे पदयात्रा आल्यानंतर येथील शेतकरी विठ्ठल शिनगारे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी गेले. या वेळी २५ मिनिटे त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. विठ्ठल यांनी पीक विमा भरूनही माेबदला काही मिळत नसल्याची तक्रार केली. दरम्यान, पदयात्रेत हातात तिरंगा ध्वज घेऊन कार्यकर्ते घोषणा देत होते. नागरिक यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी उभे होते.

श्रीजया चव्हाण पदयात्रेत यात्रा देगलूरमध्ये दाखल हाेताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनी राहुल गांधींसाेबत पदयात्रेत सहभाग घेतला. श्रीजया राजकारणात येणार की नाही, यासंदर्भात अशाेक चव्हाणांना प्रश्न विचारला हाेता. तेव्हा श्रीजया याबाबत ठरवेल असे उत्तर त्यांनी दिले होते. पण आज पदयात्रेत सहभागी झाल्याने त्यांचा राजकीय प्रवेश झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

तीन माजी मुख्यमंत्री अन् काँग्रेस पदाधिकारी यात्रेत सहभागी पदयात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेसचे मीडिया प्रमुख जयराम रमेश, योगेंद्र यादव, कन्हैयाकुमार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...