आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्याकुमारीपासून सुरू झालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी (७ नाेव्हेंबर) नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. हाती मशाल घेऊन लाखोंच्या संख्येने लोक या वेळी राहुल गांधी यांच्यासोबत होते. देगलूर येथील नगर परिषदेशेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात यात्रेचे आगमन होताच बंजारा, आदिवासी नृत्य व पोवाडा या महाराष्ट्रातील लोकनृत्याने राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. घोषणाबाजी अन् रोषणाईने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, महाराष्ट्र-तेलंगणातील मेनूर येथे सभा झाली. सीमेवरील सलाबादपूर येथे राहुल गांधी यांनी हनुमान मंदिरात दर्शन घेत महाराष्ट्रात देगलूर तालुक्यातील पिंपळगावमध्ये त्यांचा प्रवेश झाला. या वेळी त्यांच्यासोबत तेलंगणातील हजारो नागरिक महाराष्ट्रापर्यंत आले होते. भारत जोडो यात्रेसाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यात्रेचे ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. देगलूर येथे उभारण्यात आलेल्या महागाई, बेरोजगारीवरील कटआऊटमधून केंद्र सरकारवर रोष व्यक्त करण्यात येत होता. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी, बॅनर, झेंडे व लेझरच्या आकर्षक रोषणाईने परिसर उजळून गेला होता. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. दुचाकी फेरी काढून घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन या वेळी घडवण्यात आले. वेशभूषा परिधान करून आदिवासी, बंजारा नृत्य करण्यात आले.
घोषणांनी परिसर दुमदुमला
‘भारत जोडो’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मशाल यात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती. आठ वाजून ५० मिनिटाला सुरू झालेली मशाल पदयात्रा ४० मिनिटे पुढे येऊन देगलूरमध्ये पोहचली.
ठिकठिकाणी स्वागत कमानी, दुभाजकांची रंगरंगोटी
स्वागतासाठी नांदेड-देगलूर रोडवरील लेंडी नदीवरील पुलापासून छत्रपती शिवाजी उद्यानापर्यंत व देगलूर-उदगीर रोडवरील पालिकेच्या नवीन इमारतीपासून सिद्धेश्वर मंगल कार्यालयापर्यंत अनेक ठिकाणी स्वागतपर कमानी उभारण्यात आल्या आहेत. तेलंगणातील हजारो नागरिक देगलूरपर्यंत राहुल गांधी यांच्यासोबत देगलूरमध्ये आले.
राहुल यांनी दिल्या शिवरायांच्या घोषणा
यावेळी राहुल गांधी यांनी “छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ची घोषणा दिली. रात्री पावणेदहा वाजता तुम्ही माझे स्वागत केले या बद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे, असे सांगून सभेला आलेल्यांचे आभार मानले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नांदेडमध्ये तळ ठोकून
या भारत जोडो पदयात्रेला केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण या राज्यांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तेथे लाखोंचा समुदाय पदयात्रेत सहभागी झाला. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात यात्रेचे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असे स्वागत करण्याच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, राजू वाघमारे यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.