आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:लेकीने आईच्या पार्थिवावर सोडला प्राण, दोन तासांच्या अंतराने दोघींवर अंत्यसंस्कार

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयमाला जाधव आणि गयाबाई शेवाळकर. - Divya Marathi
जयमाला जाधव आणि गयाबाई शेवाळकर.

नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) या गावात आईच्या निधनाची बातमी कळताच अंत्यदर्शनासाठी आलेल्या लेकीने हंबरडा फोडला आणि पार्थिवावर कोसळली. या वेळी लेकीचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) मध्यरात्री घडली. तामसा येथील ज्येष्ठ नागरिक गयाबाई किसनराव शेवाळकर (७५) यांचे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. निधनाची माहिती येवली येथे राहणाऱ्या गयाबाई यांची मुलगी जयमाला दिलीपराव जाधव (५५) यांना कळवण्यात आली.

तामसा-येवली अंतर दहा किलोमीटर असल्याने अर्ध्या तासात जयमाला यांनी तामसा गाठले. आईचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. आईच्या निधनाचे अतीव दुःख झाल्याने जयमाला ओक्साबोक्सी रडत होत्या. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या चक्कर पडल्या. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. गयाबाई शेवाळकर यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

दोन तासांच्या अंतराने दोघींवर केले अंत्यसंस्कार
अर्ध्या तासाच्या अंतरात आई व विवाहित मुलीच्या निधनानंतर शनिवारी (ता.१) दुपारी दोन तासांच्या अंतराने तामसा येथे गयाबाई यांच्या पार्थिवावर, तर येवली येथे जयमाला जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयमाला यांच्या पतीचे आठ महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे.