आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परखड बोल:गडकरींप्रमाणे देशाच्या नेतृत्वाने सहकार्याची भूमिका ठेवावी : शरद पवार

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकासाचा प्रश्न जेथे येतो त्याठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका अत्यंत सहकार्याची व सामंजस्याची असते. हाच दृष्टिकोन देशाचे नेतृत्व करणाऱ्या घटकाने ठेवला तर देशाचा चेहरा बदलेल, असा शाब्दिक चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काढला.

खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांच्या ‘सहकारसूर्य’ या गोदावरी अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय उद्घाटनप्रसंगी शनिवारी (१४ मे) नांदेड येथे ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आरबीआय बँकेचे संचालक सतीश मराठे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम आदींची उपस्थिती होती. पुढे बाेलताना शरद पवार म्हणाले की, राजकीयदृष्ट्या नितीन गडकरी व आमची भूमिका वेगळी आहे. पण विकासाच्या दृष्टिकोनातून ते सक्षमपणे पुढाकार घेत असतात. विकासाच्या प्रश्‍नांवर हीच भूमिका सर्वांनी ठेवणे अपेक्षित आहे. या देशात ६१ ते ६२ टक्के लोक शेती क्षेत्रात काम करतात. ८० टक्के लोकांकडे शेती आहे. सबंध देशाच्या ६० टक्के जमिनीला खात्रीशीर पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीत कष्टकऱ्यांनी कितीही कष्ट केले तरी निसर्गाच्या लहरीपणावर आवलंबून राहावे लागते. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेतीत सहभाग घेऊन शेतकऱ्यांचा भार कमी केला पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाला उपस्थिती लावत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उद्घाटन साेहळ्याला शुभेच्छा दिल्या. मंत्री धनंजय मुंडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

सुटाबुटातील व्यक्तीला बँकेत चांगली वागणूक
बँकेत सुटाबुटातील व्यक्तीला चांगली वागणूक दिली जाते. गरीब व्यक्तीला बँकेत उभेही राहू दिले जात नाही. सहकारी बँकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन रिझर्व्ह बँकेचा सहानुभूतीचा असला पाहिजे. लोकांना मदत करण्याची भावना सहकारी बँकेकडे अधिक असते, असे मत शरद पवार यांनी मांडले.

नांदेडला लवकरच पोलिस आयुक्तालय : गृहमंत्री वळसे पाटील
जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे बळ वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच नांदेड येथे पोलिस आयुक्तालय निर्माण होईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. संजय बियाणी हत्या व जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी यासंदर्भात पत्रकारांनी वळसे पाटील यांनी विविध प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीसंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. शिवाय बियाणी खुनाच्या संदर्भात तपासाचा आढावा घेतला आहे. खुनाचा उलगडा होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. बियाणी हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे देण्याची गरज नसून राज्याचे पोलिस यासाठी सक्षम असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...