आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडच्या 6 तालुक्यांना महाराष्ट्र नको!:तेलंगणात समावेशाची मागणी; सीमावर्ती भागातल्या प्रश्नांसाठी कृती समिती आक्रमक

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सीमावादाचा भडका उडाला असताना आता नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांनी आम्हाला तेलंगणात जायचे आहे, अशी मागणी केलीय. त्यामुळे या भागातली खदखद समोर आलीय.

माहूर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील नागरिकांनी तेलंगणात जायची इच्छा व्यक्त केलीय. तसेच या प्रकरणी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. त्यासाठी "प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे" ही कृती समिती स्थापन करण्यात आलीय.

कशासाठी केली मागणी?

नांदेड जिल्ह्यातले अनेक तालुके मागास आहेत. तिथल्या लोकांना हव्या त्या सोयी-सुविधा मिळत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तेलंगणात मात्र परिस्थिती वेगळीय. तिथे मजूर, नोकरदार आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभे राहते. मोफत वीज, पाणी, बी-बियाणे, शेती अवजारे मिळतात. कृषीपंप, विहिरीच्या योजना आहेत. त्यामुळे तिकडे जीवन सुकर होईल, असे या भागातल्या नागरिकांना वाटते.

तेलंगणात मोफत शिक्षण

तेलंगणा सरकार गरिबांना मदत करण्यासाठीही सरसावले आहे. त्यांच्यासाठी दिन बंधू योजना राबवते. त्यातून त्यांना घरे मिळतात. व्यवसायासाठी आर्थिक मदत होते. तिथे शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था चांगली आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थित मदत तर होतेच. शिवाय चार एकर जमीन मिळते. त्यामुळे या नागरिकांनी तिकडे जायची इच्छा व्यक्त केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी "प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे" ही कृती समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय.

बोम्मईंनी उकरला मुद्दा

महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या 40 गावांवर दावा करणार असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे या वादाला सुरुवात झालीय. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या 40 गावांनी आम्हाला कर्नाटकमध्ये घ्या, असा ठराव 2012 मध्ये केला होता. पाणीप्रश्नाला कंटाळून या गावांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. या ठरावाचा आम्ही आता गांभीर्याने विचार करत आहोत. सांगतली जिल्ह्यातल्या गावांवर दावा सांगणार आहोत, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दिलाय. त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एकही गाव देणार नाही. उलट बेळगाव, कारवार, निपाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे सडेतोड उत्तर दिलेय.

पंढरपूरकरही आक्रमक

एकीकडे सीमावर्ती भागातल्या चाळीस गावांवर कर्नाटकने दावा केलाय. तर दुसरीकडे पंढरपूरच्या नागरिकांनी चक्क कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय. चंद्रभागेच्या तीरावर होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध म्हणून नागरिक आक्रमक झालेत. आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर येणाऱ्या आषाढीच्या महापूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना बोलावू, असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यासाठी नागरिकांनी नुकतेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलनही केले. येणाऱ्या काळात यावरूनही वाद पेटण्याची शक्यताय.

बातम्या आणखी आहेत...