आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मविआवर पुन्हा प्रश्नचिन्ह, म्हणाले - आम्ही अजूनही संभ्रमात

परभणी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. राज्यात एका विपरीत स्थितीत महाविकास आघाडी झाली होती, असे वक्तव्य करुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.

आज परभरणीत काँग्रेसच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोलेंनी महाविकास आघाडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सामनातील जाहिरातीवर नाराजी?

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज मुख्यमंत्री शिंदे व पंतप्रधान मोदींची जाहीरात झळकली आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेला खोके पोहोचले का?, असा सवाल मनसेने केला होता. त्यावर नाना पटोलेंना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र नाही, अशी भूमिका नाना पटोलेंनी मांडली.

विपरित स्थितीमुळे मविआ

नाना पटोले म्हणाले, राज्यात एका विपरित स्थितीत महाविकास आघाडी झाली होती. तेव्हा भाजप व शिवसेनेमधील भांडण व नंतर झालेला पहाटेचा शपथविधी सगळ्यांच्या परिचयाचा आहे. केवळ भाजपला विरोध म्हणून किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडीची स्थापना झाली होती.

MCA निवडणुकीत सर्व एकत्र आले

नाना पटोले म्हणाले, ज्यांना आमची विचारसरणी मान्य आहे. जे आमच्या विचारसरणीच्या सोबत आहे, तेच आमचे मित्र असतील. भाजप देशाचे मोठे नुकसान करत आहे. त्यामुळे अशा भाजपसोबत आमच्या मित्रपक्षांचा संबंध नसावा, असे आमचे म्हणणे आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या एमसीए निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आल्याचे सर्वांनी पाहिले. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत आम्ही अजूनही संभ्रमात आहोत.

मविआबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहणार की नाही, यावर भाष्य करणे मात्र नाना पटोलेंनी टाळले. नाना पटोले म्हणाले, मविआमध्ये रहायचे की नाही हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील. मात्र, किमान समान कार्यक्रमामुळे आम्ही मविआत सामील होण्याचे मान्य केले. आम्ही सर्वांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे. राज्यात मविआ सरकार स्थापन झाले तेव्हाच काँग्रेसचा मुख्यमंत्री करा, अशी मागणी आम्ही करू शकलो असतो. मात्र, सोनिया गांधी यांनी वाद टाळत इतर पक्षांना ही संधी दिली. मात्र, आता काही ठिकाणी भाजपसोबत आमचे मित्रपक्ष दिसत असल्याने आम्ही संभ्रमात आहोत.

बातम्या आणखी आहेत...