आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अॅक्शन मोडवर:रिंदाच्या शेतवस्तीवर झाडाझडती; त्याच्या साथीदारांवरही करडी नजर, एसआयटी, डीबी व गुन्हे शाखेची विशेष ३ पथके

नांदेड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणातील करनालमध्ये स्फोटके व शस्त्रांसह चार संशयित दहशतवाद्यांना गजाआड केल्यानंतर नांदेड पोलिस सतर्क झाले आहेत. पकडलेले सर्व संशयित नांदेड येथील कुख्यात गुंड व खंडणीबहाद्दर हरविंदर संधू ऊर्फ रिंदाचे सहकारी असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी (६ मे) पथके तयार करून कुख्यात गुन्हेगार रिंदाच्या शहर परिसरात असलेल्या शेत आखाड्यावर झाडाझडती घेणे सुरू केले. त्याच्या इतर साथीदारांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.

करनालमध्ये कुख्यात गुन्हेगार हरविंदरसिंघ ऊर्फ संधूचे हस्तक तथा दहशतवादी गुरमीत, अमनदीप, परमिंदर आणि भूमिंदर यांच्यामार्फत नांदेडसाठी स्फोटके, हत्यारे, दारूगोळा पाठवला जात होता. पण सर्वजण पकडले गेले. दरम्यान, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी गांभीर्याने घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या. त्यानुसार कुख्यात गुन्हेगार हरविंदरसिंघ ऊर्फ रिंदा याच्या नांदेड येथील टोळीतील सर्व सदस्यांची व अभिलेखावरील गुन्हेगारांच्या घरझडत्या घेऊन तपासणी करण्याचे धाडसत्र सुरू करण्यात आले. दरम्यान, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक द्वरकादास चिखलीकर यांनी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्फोटके शोधणाऱ्या श्वानला सोबत घेऊन रिंदाच्या शेत आखाड्याची तपासणी केली. या ठिकाणी त्यांना काही आक्षेपार्ह सापडले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

रिंदाचे ५० साथीदार नांदेडमध्ये
मोस्ट वाँटेड हरविंदरसिंग ऊर्फ रिंदा याच्यावर २०१६ पासून पंजाब व नांदेड जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. रिंदा हा पंजबाचा असून त्याचे नांदेड येथे शिक्षण झाले आहे. नांदेड येथे रोशनसिंग माळी व रिंदा यांच्यात एकमेकांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल झाले. त्याच्या नावे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. नांदेड शहरात रिंदाचे ५० साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा पोलिसांनी वेळोवेळी त्यांची झडती, तपासणी केली आहे. १७ आरोपी कारागृहात असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच काही आरोपी फरार, तर काहींना जामीन मिळाला असल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले आहे.

रात्री, दिवसा तपासणी
विशेष धाडसत्र व घरझडती मोहिमेसाठी शहरातील एसआयटी पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी इतवारा व नांदेड शहर, शहरातील पोलिस ठाण्याचे डीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पोलिस पथके तयार केली आहेत. ही सर्व पथके करनालमध्ये पकडण्यात आलेले चार दहशतवादी व त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली स्फोटके व दारूगोळा यासंबंधी बारकाईने घरझडत्या घेऊन माहिती घेत आहेत. विशेषत: स्वत: पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक व नेमण्यात आलेले पोलिस पथकांतील पोलिस अधिकारी व अंमलदार हे रात्री व दिवसा अचानकपणे रिंदाच्या साथीदारांची तपासणी करत आहेत, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...