आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव व मध्य प्रदेशचे प्रभारी कृष्णकुमार केदारनाथ पांडे (६९) यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान हृदयविकाराने मंगळवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी (७ नोव्हेंबर) नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता वन्नाळीच्या गुरुद्वारा येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. तीन किलोमीटर अंतरावर पदयात्रा येताच सकाळी नऊच्या सुमारास पांडे हे हातात राष्ट्रध्वज घेऊन जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या वेळी त्यांनी सोबत असलेल्या द्विग्विजयसिंग व जयराम रमेश यांच्याजवळ हातातील ध्वज दिला. त्यानंतर ते खाली कोसळले. कृष्णकुमार यांना युवक काँग्रेसच्या अॅम्ब्युलन्सने शंकरनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. श्रीकृष्णकुमार पांडे हे सोमवारीच पत्नी व मुलासह नांदेडमध्ये दाखल झाले होते. ते उत्तर नागपूरमधील वैशालीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या नागपूर येथे शिक्षण संस्था असून ते काँग्रेस सेवा दलाचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते होते. दरम्यान, कृष्णकुमार पांडे यांच्या निधनामुळे आजची पदयात्रा कोणताही गाजावाजा न करता, शांततेने पुढे निघाली तसेच संध्याकाळी भोपाळा गावात शोकसभा घेण्यात आली.
सकाळी कार्यकर्त्यांसोबत केला नाश्ता : मंगळवारी सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत नाश्ता केला. पदयात्रेपूर्वी झालेल्या ध्वजवंदनास ते उपस्थित होते. त्यांनी आमची विचारपूसही केली. काही वेळानंतर त्यांनी आपली साथ सोडल्याचे समजले, असे सांगताना नागपूरचे माजी नगराध्यक्ष बाबा शेळके यांना गहिवरून आले.
पांडेंच्या हाती जीवनाच्या शेवटच्या क्षणी तिरंगा : राहुल खासदार राहुल गांधी यांनी कृष्णकुमार पांडे यांच्या मुलांची भेट घेऊन सांत्वन केले. कृष्णकुमार पांडे यांचे निधन संपूर्ण काँग्रेस परिवारासाठी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबाप्रति मी सहवेदना प्रकट करतो. जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या हातात तिरंगा होता. देशासाठी त्यांचे समर्पण सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.