आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:मांजरा नदीच्या काठी 10 किमीपर्यंत वृक्षारोपण; 14 गावांचाही सहभाग

लातूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र केवळ ०.६ टक्के इतके आहे. वनांचे सरासरी क्षेत्र ३३ टक्के असावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लोकसहभागातून प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने रविवारी मांजरा नदीकाठावर १० किमीपर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली. एकूण १४ गावांत २८ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. भातखेड येथे वृक्षारोपण करत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मोहिमेचे उद्घाटन केले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रामपंचायत तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने याही वर्षी लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत जबाबदारी समजून सुरू ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकही याबाबतीमध्ये जागरूक आहेत. या वृक्ष लागवडीसाठी नागरिकांतून सहभाग प्रोत्साहन मिळत आहे, ही छोटी चळवळ असून अविरतपणे सुरू ठेवणार आहोत. या वेळी मा. आ. पाशा पटेल, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव निवृत्ती, गटशिक्षणाधिकारी संजय पंचगले, माजी सरपंच शांताबाई मुळे, उपसरपंच विकास बेद्रे, ग्रामसेवक खंडू कलबोने आदींची उपस्थिती होती.

या गावांत वृक्षारोपण
लातूर तालुक्यातील भटखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु.), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावात वृक्ष लागवड करण्यात आली. अनेक शैक्षणिक व समाजसेवी संघटनांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, ११ वाजून ११ मिनिटांनी, १० किलोमीटरची मानवी साखळी करत २८ हजार वृक्षाची लागवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...