आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबुरीचा सल्ला:पॉलिटिकल वॉर गँगवॉर होऊ नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्री अशोक चव्हाण यांचे उद्गार

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड : एकमेकांचे कायम विरोधक राहिलेल्या देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अशोकराव चव्हाण (ता. नायगाव) येथील कार्यक्रमात गप्पांमध्ये रंगले. - Divya Marathi
नांदेड : एकमेकांचे कायम विरोधक राहिलेल्या देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अशोकराव चव्हाण (ता. नायगाव) येथील कार्यक्रमात गप्पांमध्ये रंगले.

सध्या राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. पॉलिटिकल वॉर गँगवॉर होऊ नये, याची खबरदारी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी देशातील वातावरण बदलण्याची गरज आहे. सत्ता कोणाचीही असो मराठवाड्याच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले.

नांदेड जिल्ह्यातील कुंटूर (ता. नायगाव) येथे रविवारी दिवंगत गंगाधारराव देशमुख कुंटूरकर स्मारक लोकार्पण समारोह व “धूरंधर’ या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बाेलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. पुढे बाेलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यात सद्य:स्थितीत चालू असलेला पॉलिटिकल वॉर बंद झाले पाहिजे. माझी दोन्हीकडील नेत्यांना हात जोडून विनंती आहे. एकत्र बसा आणि आपापसातील वाद संपुष्टात आणा. यामुळे राज्याचा राजकारणाचा स्तर अतिशय खालावत चालला आहे, तो राष्ट्रविघातक आहे. तसे देवेंद्रजी व मी मुंबईत शेजारी-शेजारी असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रासाठी अतिशय चांगले काम असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी केली. कार्यक्रमाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.विक्रम काळे, खा. हेमंत पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील आदींची उपस्थिती होती.

चव्हाण यांचे शक्तिप्रदर्शन; दीड तास वाहतूक खोळंबली
दिवंगत कुंटूरकर यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यास काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी जवळपास ४०० गाड्यांचा ताफा सोबत आणल्याने मोठे शक्तिप्रदर्शन दिसून आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर कार्यक्रमास्थळी पालकमंत्री अशोक चव्हाण पोहोचले होते. यावेळी गाड्यांमुळे नायगाव रस्त्यावरील वाहतूक जवळपास एक ते दीड तास खोळंबली होती.

तुम्ही ‘अॅडजस्ट’ केले तर आणखी चांगले चालेल
महाविकास आघाडीचे काम चांगले चालले आहे. मात्र तुम्ही ‘अ‍ॅडजस्ट’ केले तर आणखी चांगले चालेल, असे मंत्री चव्हाण म्हणताच एकच हशा पिकला. बुलेट ट्रेन विदर्भात जात आहे. याचा आनंद आहे, मात्र, मराठवाड्यातून ही जावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी नांदेडमार्गे हैदराबादपर्यंत बुलेट ट्रेन धावली पाहिजे. यासाठी देवेंद्रजी तुम्ही पंतप्रधानांना सांगा, अशी विनंतीही मंत्री चव्हाण यांनी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले- मतभेद असावेत, पण शत्रुत्व नको‘अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचे कामही व्हायला हवे’
राजकाराणात सर्वांचे राजकीय विरोधक असतात. राजकीय विरोध असला तरी सर्वांना एका मंचावर येता आले पाहिजे, बोलता आले पाहिजे, राजकारणात राजकीय वैचारिक मतभेद असायला पाहिजे, मात्र शत्रुत्व नसावे हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबरोबर बुलेट ट्रेनचेही स्वप्न साकार होणार आहेे. २०१४ ते २०१८ पर्यंत मी मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेनविषयी काही जण प्रतिप्रश्न करायचे. आता होत असलेले हे काम पाहून समाधान वाटत आहे. याच महामार्गाचा जालना ते नांदेड असा विस्तार करण्यात आला आहे. या मार्गाबरोबरही बुलेट ट्रेन करण्यात येणार आहे. या महामार्गाचे काम पुढे हैदराबादपर्यंत विस्तार करण्याची विनंती आपण गडकरी यांच्याकडे करणार आहोत. याचबरोबर देशातील अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचेही कामही झाले पाहिजे. या मार्गाला राज्यात विरोध होत असल्याने हे काम थांबले आहे. तेव्हा अशोकराव, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा तरच तुमची बुलेट ट्रेन हैदराबादपर्यंत धावेल, असे फडणवीस या वेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...