आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रा पाण्यावरचा बुडबुडा:प्रकाश आंबेडकरांची टीका, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर- प्रकाश आंबेडकर भाजपचे प्रवक्ते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जोडो यात्रा पाण्यावरचा बुडबुडा आहे. यातून काय विधायक काम होत आहे, हे दिसत नाही, अशी टीका वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तर, प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिले आहे.

यात्रेतून विधायक काम नाही

नांदेड येथे जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्हीसुद्धा लाँग मार्च काढला होता. चालताना काय त्रास होतो याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, राहुल गांधींच्या भारत यात्रेतून विधायक काम होताना दिसत नाही. ही यात्रा म्हणजे निव्वळ पाण्यावरील बुडबडा आहे.

प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम

प्रकाश आंबेडकरांच्या या टीकेवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. नाना पटोले म्हणाले, प्रकाश आंबेडकर भाजपाची बी टीम आहेत. ते भाजपाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत.

पटोले म्हणाले, आपल्या राज्यात एक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम आहेत. प्रकाश आंबेडकर भाजपाचे प्रवक्ते झाले आहेत, असे त्यांच्या वक्तव्यातून लक्षात येतं. ते भाजपासाठी काम करत आहेत.

काँग्रेसकडे काहीही शिल्लक नाही

तसेच, काँग्रेसकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. नांदेडकर आणि लातूरकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर काँग्रेसमधून कोणीही जाणार नाही, असा दावा नाना पटोलेंनी केला आहे.

...तरच देश एकसंघ

दरम्यान, नांदेड येथील सभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात समाज, धर्म, जातीवरून तेढ निर्माण होत आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यासाठी राजकीय पक्ष पुढाकार घेत आहेत. त्यामुळे जातीयवाद वाढला आहे. येथील जातिव्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही. यासाठी देश एकसंघ ठेवण्यासाठी जाती जोडो अभियान राबवणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...