आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:प्रश्न प्रलंबित ;  कॉडलाइन झाल्यास तिरुपती, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद प्रवासाचा वाचेल वेळ

शरद काटकर | नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधिीक छायाचित्रे - Divya Marathi
प्रतिनिधिीक छायाचित्रे

दक्षिण मध्य रेल्वेचे जाळे वेगाने वाढत असताना येथे विविध रेल्वेस्थानकांवर बायपासची आवश्यकता आहे. परिणामी इंधन व वेळेचा अपव्यय होतो. बायपास झाल्यास इंजिन लोकोरिव्हर्सलचा (इंजिन बदलून लावणे) वेळ वाचेल आणि एकाच स्थानकावर २० ते २५ मिनिटे गाडी थांबवून ठेवण्याची गरज पडणार नाही. नांदेड विभागात प्रामुख्याने परभणी, पूर्णा, मुदखेड, परळी वैजनाथ व अकोला जंक्शन येथे कॉडलाइन आवश्यक आहे. येथे ही सुविधा उपलब्ध झाल्यास तिरुपती, बंगळुरू, दिल्ली, जयपूर, अमृतसर, जम्मू, हैदराबादला जाणाऱ्या गाड्यांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

मराठवाड्यात १५ ते २० वर्षांपूर्वी ब्रॉडगेज पूर्णत्वास आले. आजपर्यंत बायपासच्या कमतरतेमुळे इंधनचे व वेळेची बचत थांबवता आली नाही. शिवाय रेल्वेचे दळणवळणही वाढवण्यासाठी चालना मिळाली नाही. परभणी, पूर्णा या जंक्शनवर रेल्वे मालधक्का आहे. इंजिन लोकोरिर्व्हसलमुळे अनेक वेळा मालगाड्यांना व प्रवासी रेल्वे धावण्यास उशीर होतो. मागील काही दिवसांपूर्वी परभणी, पूर्णा, मुदखेड व परळी वैजनाथ जंक्शनवर अंतिम जागा पाहणी निश्‍चित केल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात रेल्वे बोर्डाकडून मंजुरी केव्हा मिळेल हे निश्‍चित नाही. देशात सध्या रेल्वे विद्युतीकरणाचे जाळे मोठ्या प्रमाणात होत आहे. पण, कॉडलाइनअभावी वेळेची बचत थांबवता येणार नाही. नांदेड विभागाने या कॉडलाइनशी लवकरात लवकर निर्मिती करून मोठ्या प्रमाणात दळणवळण व रेल्वे प्रवासी वाहतुकीस चालना मिळेल, असे प्रयत्न करावे, अशी रेल्वे संघटनांकडून मागणी होत आहे. तसेच मध्य रेल्वेत सध्या दौंड जंक्शन कॉडलाइन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन व वेळेची बचत होत आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यातील नांदेड विभागातील पूर्णा, परभणी, परळी आदी स्थानकांवर कॉडलाइनची (बायपास) निर्मिती व्हावी. यातून विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा मराठवाड्यातील विविध रेल्वे संघटनांकडून व्यक्त होत आहेे.

इंजिन बदलीचा तिढा सुटेल, इंधनाचीही होणार बचत कॉडलाइन म्हणजे काय? एखादी प्रवासी रेल्वेगाडी जंक्शनवर आल्यास तिचे इंजिन काढून विरुद्ध दिशेला जोडावे लागते. कॉडलाइन झाली तर स्थानकाच्या अलीकडून बायपासची निर्मिती होते. कॉडलाइनसाठी केवळ काही अंतराचा नवीन रेल्वे ट्रॅक टाकावा लागतो. गरज असल्यास नवीन रेल्वेस्थानकाचीही निर्मिती करता येते. उदा. मध्य रेल्वेतील दौंड जंक्शन व दौंड कॉडलाइन असे दोन वेगळे स्थानक केले आहेत. मनमाडकडून पुण्याकडे जाण्यासाठी पूर्वी दौंड जंक्शन येथे इंजिनला लोकोरिर्व्हसल करणे बंधनकारक होते. पण, दौंड कॉडलाइनमुळे मनमाड-पुणे या मार्गावर या रेल्वेस्थानकामुळे लोकोरिर्व्हसल बंद झाले आहे.

या स्थानकांचा व्हावा विचार नांदेड विभागात औरंगाबाद-हैदराबाद एक्सप्रेस, काचीगुडा-अकोला-नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेसला लोकोरिर्व्हसल होते. यासाठी किमान १५ ते २० मिनिटे लागतात. परभणी जंक्शन व पूर्णा जंक्शन येथे कॉडलाइन झाल्यास या दोन्ही रेल्वेंचे लोकोरिव्हर्सल वाचवून इंधनासोबतच वेळीची बचत होईल. पूर्णा व परळी स्थानकावर लोकोरिर्व्हसल झाल्यास पूर्णा-अकोला मार्गाने जाणाऱ्या हैदराबाद-जयपूर या गाडीसह तिरुपती-अमरावती, नांदेड-जम्मू तावी, नांदेड-अमृतसर, परभणी-परळी मार्गावरील शिर्डी-काकीनाडा, सिकंदराबाद-शिर्डी, नांदेड-बंगळुरू, परळी-लातूर रोड मार्गाने जाणारी नांदेड-पनवेल एक्सप्रेसला फायदा होऊ शकतो. मराठवाड्यातील रेल्वे संघटनेकडून पाठपुरावा सुरू मराठवाड्यातील विविध रेल्वे संघटनेकडून या कॉडलाइनसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. पण, प्रत्यक्षात मात्र रेल्वे बोर्डकडून अद्याप मंजुरी मिळाली नाही, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अरुण मेघराज यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...