आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू देव-देवतांचे पूजन केले जात असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचे आदिवासी कोळी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने नाकारले. त्यामुळे आदिवासी बांधवांनी चक्क देव-देवतांचाच त्याग केला. दरम्यान, गुरुवारी (५ जानेवारी) जिल्हा प्रशासनाने मोर्चाला परवानगी न दिल्याने आदिवासी कोळी बांधवांनी आयटीआय चौकात सभा घेत तहसीलदार अंबेकर यांच्याकडे देव-देवता सुपूर्द केल्या.
नांदेड जिल्ह्यातील मयूरी पुंजरवाड या आदिवासी कोळी समाजाच्या विद्यार्थिनीने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी तिने औरंगाबादच्या जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज दिला होता. समितीने वैधता तपासणी करत जात वैधता नाकारली. अर्जदार मयूरीने महादेव आणि खंडोबाची पूजा केली जात असल्याचे सादर केले आहे. महादेव आणि खंडोबाची पूजा साधारणतः हिंदू धर्मात केली जाते. तसेच अर्जदाराची विवाह पद्धती हिंदूंप्रमाणे असल्याची सबब देत जात पडताळणी समितीने वैधता नाकारली. या निकालानंतर आदिवासी कोळी समाजबांधव आक्रमक झाले. नांदेडमध्ये गुरुवारी शेकडो आदिवासी महिला आणि बांधवांनी देव सोबत घेत देव-देवतांचा त्याग करण्यासाठी आंदोलन केले. जिल्हा प्रशासनाने मोर्चाला परवानगी न दिल्याने आदिवासी कोळी बांधवांनी आयटीआय चौकात सभा घेत तहसीलदार आंबेकर यांच्याकडे आपल्या देव-देवता सुपूर्द केल्या. शेकडो महिला आणि पुरुषांनी आपल्या देव-देवता तहसीलदारांकडे देत देव-देवतांचा त्याग केला. हिंदू देव-देवतांची पूजा केल्याने जर जात वैधता नाकारली जात असेल तर अशा हिंदू आणि देवतांचा आम्ही त्याग करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तहसीलदारांनी स्वीकारल्या आंदोलकांकडून प्रतिमा राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार किरण अंबेकर यांनी आंदोलनस्थळी येत देवी-देवतांच्या प्रतिमा स्वीकारल्या आणि आंदोलकांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या ऐकून घेतल्या. या वेळी शेकडोंच्या संख्येने आलेल्या महादेव कोळी समाजाच्या नागरिकांनी देव-देवतांच्या प्रतिमा तहसीलदाराकडे सुपूर्द केल्या.
आता मला समितीने जात वैधता प्रमाणपत्र द्यावे महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र नसल्याने उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळत नव्हता. हिंदू देव-देवतांची पूजा करत असल्याने औरंगाबादच्या जात पडताळणी समितीने अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. देवी-देवतांची पूजा केल्यामुळे एवढी शिक्षा मिळत असेल तर आम्ही सन्मानपूर्वक देवी-देवतांच्या प्रतिमा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करतो. आता आम्हाला महादेव कोळी समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र द्यावे. - मयूरी श्रीकृष्ण पुंजरवाड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.