आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:बिल्डर संजय बियाणी हत्येचा सूत्रधार दहशतवादी रिंदाच, सहा आरोपींना अटक; गोळ्या झाडणारा फरारच

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणाचा ५५ दिवसांनंतर उलगडा झाला असून पोलिसांनी मंगळवारी (३१ मे) ६ आरोपींना अटक केली. यात गोळीबार करणाऱ्यासह अन्य आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. यात खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंग ऊर्फ रिंदाचा सहभाग असून ५ कोटींच्या खंडणीसाठी बियाणी यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय बियाणी यांची ५ एप्रिल २०२२ रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी शारदानगर परिसरातील त्यांच्या घरासमोर गोळया झाडून हत्या केली होती. या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या शोधासाठी भोकरचे अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांचे एसआयटी पथक स्थापन केले होते. त्यांच्या मदतीला नांदेडचे अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, स्थागुशाचे पो. नि. द्वारकादास चिखलीकर होते. पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगण, कर्नाटक या राज्यांत जाऊन तपास केला. या वेळी चार देशांशी पत्रव्यवहार केला. तपासात आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न करून अटक केली.

सहाही आरोपी नांदेडमधील
आरोपी इंद्रपालसिंघ ऊर्फ सनी तिरथसिंघ मेजर (३५), मुक्तेश्वर ऊर्फ गोलू मंगनाळे (२५), सतनामसिंग ऊर्फ सत्ता दलवीरसिंग शेरगिल (२८), हरदीपसिंघ ऊर्फ सोनू पिनीपाना सतनामसिंघ बाजवा (३५), गुरमुखसिंग ऊर्फ गुरी सेवकसिंघ गिल (२४), करणजितसिंग रघवीरसिंग साहू (३०) यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी रेकॉर्डवरील असून नांदेडमधील आहेत. काही आरोपींना नांदेड तर काहींना इतर राज्यांतून अटक केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...