आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड जिल्ह्यातील सरसम बु. (ता. हिमायतनगर) येथील युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. रूपेश ऊर्फ धम्मपाल सखाराम थोरात (३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी रूपेश ऊर्फ धम्मपाल सखाराम थोरात यांच्या नवे ४ एकर शेती आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेकडून ९० हजारांचे कर्ज घेतले होते. तसेच कृषी विभागाकडून शेतीसाठी ट्रॅक्टर उचलले होते. मात्र अनेक वर्षांपासून अतिवृष्टी व नापिकीमुळे शेती नुकसानीत आली होती. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. मागील काळात शेतीसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली नसल्याने यंदा कृषी लोन मिळण्याची आशा धूसर झाली होती. त्यामुळे यंदा पेरणी कशी करावी या विचारात शेतकरी सतत चिंतेत राहत होता. याच विवंचनेतून रूपेश ऊर्फ धम्मपाल सखाराम थोरात याने सोमवारी शेत सर्व्हे क्रमांक २१४/२ मधील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. रूपेश अविवाहित होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला.
शवविच्छेदनानंतर नातेवाइकांना मृतदेह सुपूर्द करण्यात आला. शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.